उघूरांवरील अत्याचाराविरोधात 47 देशांची चीनला विचारणा

जीनिव्हा – चीनच्या राजवटीने झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांच्या विरोधात 47 देश एकवटले आहेत. चीन आपल्या देशातील अल्पसंख्यांकांवर अमानवी अत्याचार करीत असल्याचे विश्वसनीय पुरावे असल्याचा आरोप या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर केला. तसेच राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने उघूरांबाबतचा आपला अहवाल लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, अशी मागणी या देशांनी केली. दरम्यान, उघूरांच्या बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात देश एकवटल्यामुळे चीनची बेचैनी वाढली आहे. आपल्यावरील हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा चीनने केला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या जीनिव्हा येथील बैठकीत मंगळवारी चीनविरोधी निवेदन सादर करण्यात आले. नेदरलँड्सचे राष्ट्रसंघातील राजदूत पॉल बेकर्स यांनी 47 देशांच्या वतीने संयुक्त निवेदन वाचून दाखविले. झिंजियांगमधील मानवाधिकारांच्या मुद्यांबाबत सर्व देशांना गंभीर चिंता वाटत असल्याचे बेकर्स म्हणाले. ‘जवळपास 10 लाखांहून अधिक उघूरवंशियांना चीनने विनाकारण कैद केल्याचे सबळ पुरावे आहेत’, असा ठपका बेकर्स यांनी ठेवला. काही महिन्यांपूर्वी चीनने उघडपणे उघुरांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी शिबिरात ठेवल्याची सबब चीनने दिली होती.

मात्र चीन उघूरवंशियांचे आणि अल्पसंख्यांकांचे अधिकार चिरडून त्यांची हेरगिरी करीतअसल्याचा ठपका या संयुक्त निवेदनात ठेवला आहे. चीनकडून उघूरांवर लैंगिक अत्याचार होत असल्याची चिंता बेकर्स यांनी व्यक्त केली. उघूरवंशियांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबापासून तर महिलांना त्यांच्या पतीपासून वेगळे केले जात आहे, असा ठपका बेकर्स यांनी ठेवला. उघूरांवरील या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या राष्ट्रसंघाच्या निरिक्षकांनाही चीनने आडकाठी केल्याची आठवण बेकर्स यांनी करुन दिली.

गेल्या महिन्यात मानवाधिकार संघटनेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी झिंजियांगचा दौरा केला होता. पण चीनच्या दबावामुळे बॅशलेट यांनी यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करणे टाळल्याची टीका झाली होती. चीन उघूर आणि इतर अल्पसंख्यांकांवर करीतअसलेल्या अत्याचाराची माहिती देणारा हा अहवाल मानवाधिकार संघटनेने लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, अशी मागणी या 47 देशांनी आपल्या संयुक्त निवेदनाद्वारे केली.

दरम्यान, राष्ट्रसंघातील या निवेदनामुळे चीनची बेचैनी वाढली आहे. नेदरलँड्स आणि इतर देश चीनविरोधात अपप्रचार करीतअसल्याचा आरोप चीनचे राजदूत शेन शू यांनी केला आहे.

leave a reply