दर्फूरमधील वांशिक हिंसाचारात ५० जणांचा बळी

- सरकारकडून आणीबाणीची घोषणा

दर्फूर – सुदानच्या दर्फूर भागात झालेल्या वांशिक संघर्षात ५० जणांचा बळी गेला असून सुमारे १३२ जण जखमी झाले आहेत. ‘एल गेनैना’ भागात झालेल्या या संघर्षानंतर सुदान सरकारने ‘वेस्ट दर्फूर’ प्रांतात आणीबाणीची घोषणा केली आहे. गेल्या चार महिन्यात दर्फूर भागात वांशिक संघर्षाचा भडका उडण्याची ही तिसरी घटना आहे. सुदानच्या दर्फूर भागात तैनात केलेल्या आंतरराष्ट्रीय शांतीसेनेची मुदत गेल्या वर्षी संपली असून आता या भागात सुदानी लष्कर तैनात करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा भडकलेला वांशिक संघर्ष चिंताजनक मानला जातो.

शनिवारी अरब वंशाच्या गटाने मसालित वंशाच्या नागरिकांवर हल्ला चढवून दोन जणांची हत्या केली. यात दोन नागरिक जखमीही झाले. या घटनेने बिथरलेल्या मसालित वंशियांनी अरब वंशाच्या वस्तीवर हल्ला चढविला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ५० जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांहून अधिक काळ हा संघर्ष सुरू असून त्यात १३२ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असून बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेनंतर सुदान सरकारने ‘वेस्ट दर्फूर’ प्रांतात आणीबाणी घोषित केली आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघटनेने या भागातील मानवतावादी सहाय्य तात्पुरत्या काळासाठी थांबवित असल्याचे जाहीर केले आहे. सुदानच्या दर्फूर भागात गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ वांशिक संघर्ष व हिंसाचार सुरू आहे. पाणी, शेती व जमिनीच्या मुद्यावरून २००३ साली हा संघर्ष भडकला होता. स्थानिक जमातींनी सरकारचे निर्णय धुडकावून सशस्त्र संघर्ष सुरू केला होता. त्याविरोधात तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओमर बशिर यांनी लष्कर तैनात करून स्वतंत्र बंडखोर गटांना बळ दिले होते. या संघर्षात आतापर्यंत सुमारे तीन लाख जणांचा बळी गेला असून, २५ लाखांहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.

दर्फूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघटनेने शांतीसेना तैनात केली होती. मात्र त्यानंतरही हिंसाचारात विशेष फरक पडलेला नाही, उलट शांतीसेनेवरच हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शांतीसेनेची मुदत डिसेंबर २०२० मध्ये संपली असून त्यानंतर सुदानी लष्कर तैनात करण्यात आले आहे.

सुदानमध्ये गेल्या वर्षी बशिर यांची राजवट उलथून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यानंतर देशात राजकीय हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी शेजारी देश इथिओपियाबरोबर सीमावादही भडकण्याचे संकेत मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर दर्फूरमधील नवा हिंसाचार सुदानमध्ये नव्या अस्थैर्याला कारणीभूत ठरु शकतो, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply