लिबिया-तुर्कीच्या आव्हानांविरोधात इजिप्तकडून नव्या नौदल तळाची उभारणी

काबुल – लिबियातील अस्थैर्य वाढत असून याचा थेट परिणाम इजिप्तच्या सुरक्षेवर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, भूमध्य समुद्रातील आपल्या हितसंबंधांना लिबियाकडून असलेला धोका लक्षात घेऊन इजिप्तने नव्या नौदलतळाची उभारणी सुरू केली आहे. या नौदल तळामुळे इजिप्तचे आर्थिक हितसंबंध सुरक्षित राखले जातील, असा दावा केला जातो. तर भूमध्य समुद्रातील इजिप्तचा हा नौदल तळ तुर्कीला आव्हान देईल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

उत्तर इजिप्तच्या गरघौब बंदराच्या शेजारी ‘थर्ड ऑफ जुलै’ या नौदलतळाची उभारणी सुरू झाली आहे. मोठ्या युद्धनौकांच्या तैनातीसाठी या तळाचा वापर केला जाईल. याचे फोटोग्राफ्स स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. लिबियाच्या सीमेपासून अवघ्या २५० किलोमीटर अंतरावरील सदर तळ इजिप्तच्या ‘नॉर्दन फ्लिट’चा भाग असेल. या तळाचे काम कधी पूर्ण होईल, याची माहिती इजिप्तच्या संरक्षणदलांनी दिलेली नाही. पण या तळाच्या उद्घाटनासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांना आमंत्रित केल्याची माहिती समोर आली आहे.

इजिप्तचे सरकार उभारत असलेल्या या नौदल तळाचे माजी नौदल अधिकारी व विश्‍लेषकांनी स्वागत केले आहे. ‘लिबिया हा देश इजिप्तच्या सुरक्षेसाठी उघड आणि स्पष्ट धोका ठरू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर, लिबियापासून मिळत असलेल्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी आणि या क्षेत्रातील इजिप्तच्या आर्थिक हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी या नौदलतळाची उभारणी आवश्यक ठरते’, असे इजिप्तचे माजी नौदल अधिकारी ऍडमिराल मोहम्मद मितवाली यांनी म्हटले आहे.

भूमध्य समुद्राशी जोडलेले इजिप्तचा हा दुसरा नौदल तळ असेल. सुएझ कालव्याच्या उत्तरेकडील पोर्ट सैद हे इजिप्तचे सर्वात जुने बंदर व नौदल तळ आहे. याशिवाय इजिप्तने काही छोटे नौदल तळ विकसित केले होते. पण वर्षभरापूर्वी इजिप्तने रेड सीच्या क्षेत्रात ‘बर्निस’ आपल्या नौदलासाठी आणखी एक तळ उभारला होता. रेड सी आणि बाब अल-मन्देबच्या आखातातून होणार्‍या सागरी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी या तळाची उभारणी करण्यात आली होती. तर गरघौब येथील ‘थर्ड ऑफ जुलै’ हा इजिप्तच्या नौदलाचा तिसरा मोठा तळ ठरणार असल्याचा दावा केला जातो. हा तळ इजिप्तसाठी धोरणात्मकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा ठरेल, असा दावा माजी लष्करी अधिकारी जनरल नस्र सालेम यांनी केला.

लिबियाकडून असलेला थेट धोका ही इजिप्तसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब मानली जाते. २०११ साली मुअम्मर गद्दाफी यांच्या हत्येनंतर लिबिया कायम अस्थिर राहिला आहे. याचा थेट परिणाम लिबिया व इजिप्तमधील १,२५० किलोमीटर लांबीच्या सीमेच्या सुरक्षेवर होत असल्याची टीका इजिप्त करीत आहे.

त्यातच २०१९ साली तुर्कीने लिबियातील गृहयुद्धात सामील होऊन या देशात सिरियातील दहशतवादी व कट्टरपंथियांना घुसविल्याचा आरोप केला जातो. तुर्कीच्या या हस्तक्षेपामुळे आपल्या सुरक्षेला असलेला धोका वाढल्याचा ठपका इजिप्तने ठेवला आहे. तर भूमध्य समुद्रातील इजिप्तच्या हितसंबंधांनाही तुर्कीकडून आव्हान मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर, लिबिया व भूमध्य समुद्रातील तुर्कीकडून मिळत असलेल्या आव्हानांचा विचार करून इजिप्तने आपल्या नौदलासाठी नवा तळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात याचे फार मोठे सामरिक लाभ इजिप्तला मिळू शकतात.

leave a reply