2030 सालापर्यंत जगभरात दरवर्षी 560 आपत्ती येतील

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

कौलालंपूर – गेल्या दोन दशकांपासून दरवर्षी जगाला 350 ते 500 मध्यम किंवा मोठ्या तीव्रतेच्या आपत्तींचा जगाला सामना करावा लागला आहे. हे प्रमाण मोठे दिसत असले तरी 2030 सालापर्यंत या आपत्तींमध्ये अधिक भयावह वाढ होईल. दोन दिवसांमागे तीन किंवा वर्षभरात 560 आपत्तींचा जगाला सामना करावा लागू शकतो. वणवे, महापूर अशा हवामानाशी संबंधित नैसर्गिक आपत्तीच नाही, तर साथीचे आजार किंवा रासायनिक दुर्घटना, अशा आपत्तींचे प्रमाण येत्या काळात वाढेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या द्वैवार्षिक अहवालात दिला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘डिझास्टर रिस्क रिडक्शन-युएनडीआरआर’ या गटाने हा अहवाल तयार केला आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे समर्थन असलेल्या ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अहवालाचा दाखला युएनडीआरआरने दिला. हवामान बदलामुळे येत्या वर्षात उष्णता, दुष्काळ, पूर यांची तीव्रता वाढेल, असा इशारा काही आठवड्यांपूर्वी देण्यात आला होता. युएनडीआरआरने देखील आपल्या अहवालात हवामान बदल येत्या काळातील बहुतांश आपत्तींना कारणीभूत असेल, असे म्हटले आहे.

‘सत्य मांडून सर्वांना सजग करणे ही फक्त आवश्यकता नाही तर अतिशय महत्त्वाचे आहे’, असे युएनडीआरआरच्या प्रमुख मामी मिझूतोरी यांनी या अहवालाच्या सुरुवातीला स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांमध्ये वारंवार घडणाऱ्या आणि वाढत जाणाऱ्या आपत्तींमुळे असंख्य जणांचा बळी गेला किंवा बाधित झाले आहेत. पण येत्या काळातील आपत्तींमुळे 2030 सालापर्यंत 10 कोटी जनसंख्या गरिबीमध्ये ढकलली जाईल, असा इशारा मिझूतोरी यांनी दिला.

या आपत्तींचा देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबतही या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात आलेल्या आपत्तींमुळे दरवर्षी 170 अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे. याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना आणि तेथील गरीब जनतेला बसलेला आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांची अर्थव्यवस्था या आपत्तीमुळे सर्वाधिक बाधित झाली, असे युएनडीआरआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यासाठी युएनडीआरआरने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फिलिपाईन्समध्ये आलेल्या चक्रीवादळाचा दाखला दिला. अजूनही फिलिपाईन्सची जनता या चक्रीवादळाच्या भीषण परिणामातून बाहेर निघालेली नाही. या चक्रीवादळाने 300 हून अधिकजणांचा बळी घेतला. तर लाखोजण विस्थापित झाले व या चक्रीवादळात फिलिपाईन्चे 50 कोटी डॉलर्सचे नुकसान झाल्याची आठवण युएनडीआरआरने करुन दिली.

leave a reply