रशियाच्या मित्रदेशांनी डॉलर व युरोचा वापर कमी करावा

- रशियन मंत्र्यांचे आवाहन

ताश्कंद – रशिया आपल्या व्यापारी भागीदार देशांबरोबर राष्ट्रीय चलनातील व्यवहारांवर भर देणार आहे. या देशांनीही अमेरिकी डॉलर व युरोचा वापर कमी करावा, असे आवाहन रशियाचे उद्योग व व्यापारमंत्री डेनिस मन्तुरोव्ह यांनी केले. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये रशियाच्या वतीने ‘इंटरनॅशनल ट्रेड फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ‘ब्रिक्स’, ‘एससीओ’ व ‘ईएईयू’ गटांमधील सदस्य देशांना संबोधित करताना रशियाच्या व्यापारमंत्र्यांनी सदर आवाहन केले.

सध्या जगात व जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा दाखला देऊन रशियाच्या व्यापारमंत्र्यांनी मित्रदेशांना सावधानतेचा इशारा दिला. आपण परस्परांमधील औद्योगिक सहकार्य कसे विकसित करणार आहोत व अर्थव्यवस्थेला कोणत्या दिशेने नेणार आहोत, याचे संकेत आत्ताच्या काळातील घडामोडींमधून मिळत आहेत. परस्परांमधील व्यवहारात अधिक स्वातंत्र्य हवे असेल, तर अमेरिकी डॉलर व युरोचा वापर सोडून राष्ट्रीय चलनांमध्ये व्यवहार सुरू करायला हवेत’, असा संदेश रशियाच्या व्यापारमंत्र्यांनी दिला. रशिया व मित्रदेशांच्या संयुक्त योजना व प्रकल्पांमध्ये डॉलर व युरोचा वापर नसेल, तर व्यवहार अधिक सहज व सुलभतेने होतील, असा दावाही व्यापारमंत्री मन्तुरोव्ह यांनी केला.

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर जबर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार रशियाला ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहार यंत्रणेचा वापर करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्याचवेळी अमेरिकेसह विविध देशांमध्ये असलेल्या रशियाच्या परकीय गंगाजळीचा मोठा हिस्सा वापरण्यापासून मनाई करण्यात आली आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेसह अनेक आघाडीच्या बँका तसेच मोठ्या कंपन्यांवर डॉलर तसेच युरो चलनाशी निगडीत व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.

या निर्बंधांना पर्याय म्हणून रशियाने इतर देशांना रुबल, युआनसह संबंधित देशांच्या स्थानिक चलनांचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापारी व आर्थिक व्यवहार करणाऱ्या चीन, भारत यासारख्या देशांनी हा प्रस्ताव स्वीकारून व्यवहार सुरू केल्याचेही समोर आले आहे. आता रशियाने आपल्या प्रयत्नांना अधिक वेग देऊन त्याची व्याप्ती वाढविण्याचे संकेत दिले आहेत. रशियन मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात केलेले वक्तव्य त्याचाच भाग ठरते.

‘युरेशियन इकॉनॉमिक युनियन'(ईएईयू) हा रशियाच्या पुढाकाराने स्थापन झालेला पाच देशांचा गट आहे. तर ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'(एससीओ) हा गट चीनने आपला प्रभाव राखण्यासाठी स्थापन केला आहे. ‘ब्रिक्स’मध्ये रशियासह भारत, चीन, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका या प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. याचे सदस्य देश रशियाचे मित्रदेश आहेत. रशियन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 साली रशियाचा या तीन गटांमधील देशांबरोबरचा व्यापार तब्बल 38 टक्क्यांनी वाढला आहे. या गटातील सदस्य देशांचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील हिस्सा जवळपास 50 टक्के इतका आहे. हे लक्षात घेता या देशांनी रशियाबरोबर स्थानिक चलनांमध्ये व्यवहार सुरू करणे महत्त्वाचे ठरेल, असे संकेत उद्योग व व्यापारमंत्री डेनिस मन्तुरोव्ह यांनी दिले.

गेल्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, डॉलरचे राखीव चलन म्हणून असलेले महत्त्व अमेरिकाच संपवून टाकत आहे, असा दावा केला होता. तर रशियासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अमेरिकी डॉलरचा वापर करण्याकडे असणारा कल कमी झाला आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारात आता इतर चलनांचा वापर वाढत असल्याचा दावा ‘बँक ऑफ रशिया’च्या गव्हर्नर एल्विरा नबिउलिना यांनी केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर, जगातील काही आघाडीचे देश आपल्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरच्या हिश्श्याबाबत फेरविचार करु शकतात, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपप्रमुख गीता गोपीनाथ यांनी बजावले होते.

leave a reply