पाकिस्तानमध्ये प्रार्थनास्थळात झालेल्या बॉम्बस्फोटात ५७ जणांचा बळी

पेशावर – पाकिस्तानच्या पेशावर शहरात शुक्रवारी दुपारी प्रार्थनास्थळामध्ये झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५७ जणांचा बळी गेला तर २०० जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी शियापंथियांच्या प्रार्थनास्थळाला लक्ष्य केले असून या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानच्या सीमेजवळील शहरात झालेल्या या स्फोटामागे अफगाणिस्तानात दडून बसलेल्या दहशतवादी संघटना जबाबदार असू शकतात, अशी टीका पाकिस्तानात सुरू झाली आहे.

बॉम्बस्फोटात ५७ जणांचा बळीपाकिस्तानच्या पेशावर शहरातील किस्सा ख्वानी बाजारात ‘कुचा रिसालदार’ प्रार्थनास्थळात शुक्रवारी दुपारी हा स्फोट झाला. ऐन गर्दीच्यावेळी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविला. या स्फोटात बळी गेलेल्यांमध्ये मुलांची संख्या मोठी असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानी यंत्रणा हा बॉम्बस्फोट असल्याचा दावा करीत असताना खैबर-पख्तूनख्वाचे प्रशासन मात्र हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगत आहे. आत्मघाती दहशतवाद्याबरोबरच दोन अन्य दहशतवादी देखील या स्फोटात सामील असल्याचे विधान खैबर-पख्तूनख्वाच्या प्रशासनाने केले.

पण हा स्फोट कुणी घडविला, याबाबत पाकिस्तान सरकार तसेच सुरक्षा यंत्रणा उत्तर द्यायला तयार नाही. याआधी या भागात शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी आयएस-खोरासन या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. तर अफगाणिस्तानच्या सीमेजवळील या भागात ‘तेहरिक-ए-तालिबान’चे दहशतवाद्यांचा मोठा प्रभाव असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये तेहरिकच्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांवरील हल्लेही वाढले आहेत.

बॉम्बस्फोटात ५७ जणांचा बळीकाही तासांपूर्वीच पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टामध्ये झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले होते. यामध्ये स्थानिक पोलीस उपअधिक्षकाचा समावेश होता. या स्फोटामागे अफगाणिस्तानच्या सीमाभागात तळ ठोकलेल्या बलोच बंडखोर संघटना जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा करीत आहेत.

अफगाणिस्तानच्या सीमेवर दबा धरून असलेल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात हल्ले चढवित असल्याचा ठपका पाकिस्तानी यंत्रणा व नेते करीत आहेत. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानची राजवट या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करीत नसल्याची टीकाही पाकिस्तानने सुरू केली आहे. ड्युरंड सीमेवर तालिबान पाकिस्तानी लष्कराला आव्हान देत असून यामुळे पाकिस्तानची सुरक्षा धोक्यात येत असल्याचा आरोप पाकिस्तानात तीव्र होऊ लागला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना पाकिस्तान अस्थिर करीत असताना आपले सरकार हातावर हात घेऊन बसल्याची टीका पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार व विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply