अफगाणिस्तानात २४ तासात ५७२ दहशतवाद्यांना संपविले

  • तालिबानने कुंदूझ व सार-ए-पूलच्या राजधानीचा ताबा घेतला
  • राजधानी काबुलवर अमेरिकच्या एफ-१६ विमानांची गस्त

५७२ दहशतवाद्यांनाकाबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने तालिबानवर चढविलेल्या हल्ल्यात ५७२ दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये अफगाणी लष्कराच्या हवाई हल्ल्यांचा समावेश आहे. तर सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेच्या ‘बी-५२’ बॉम्बर्सनी काही प्रांतांमध्ये हल्ले चढविल्याच्या बातम्या आहेत. त्याचबरोबर राजधानी काबुलच्या हवाईहद्दीत अमेरिकेची ‘एफ-१६’ लढाऊ विमाने गस्त घालत असल्याचा दावा केला जातो. कुंदूझ आणि सार-ए-पूल या प्रांतांच्या राजधानीचा ताबा तालिबाने घेतल्यानंतर, अमेरिकी लढाऊ विमानांच्या काबुलवरील घिरट्या निराळेच संकेत देत आहेत. अमेरिकेने तालिबानवर भीषण हल्ल्याची तयारी सुरू केल्याचा दावा माध्यमे करीत आहेत.

अफगाणिस्तानच्या आपल्या ताब्यात आलेल्या भागात तालिबानने आपले क्रौर्य प्रदर्शित करण्यास सुरूवात केली आहे. गझनी प्रांतातील काही ठिकाणी तसेच बडाखशान आणि तखर या प्रांतातील १२ वर्षांवरील मुली आणि विधवा महिलांना तालिबानी दहशतवादी उचलून नेऊ शकतात, असे फतवे तालिबानने जाहीर केले आहेत. गेली दोन दशके तालिबानवर कारवाई करणार्‍या पाश्‍चिमात्य लष्कराला सहाय्य करणार्‍या स्थानिक आणि अफगाणी जवानांच्या घरावर हल्ले चढवून लूटमार करण्याचे आदेश या तालिबाने दिले आहेत.

५७२ दहशतवाद्यांनातालिबानच्या या निर्दयी कारवायांना उत्तर देण्यासाठी अफगाणी लष्कराबरोबर अमेरिकेनेही अफगाणिस्तानातील आपले हल्ले तीव्र केले आहेत. कतार येथील अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’च्या नेतृत्वाखाली बी-५२ बॉम्बर आणि सी-१३० गनशिप गेले दोन दिवस अफगाणिस्तानात आग ओकत आहेत. अमेरिकी बॉम्बर्सनी शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जोवझान प्रांतात भीषण हवाई हल्ले चढविले. या कारवाईत तालिबानला जबर हानी सोसावी लागल्याचा दावा केला जातो. अमेरिकी विमानांनी अशीच कारवाई हेल्मंडची राजधानी लश्करगहमध्ये केली आहे.

अफगाणी लष्कराने कंदहार, फराह, नांगरहार या प्रांतात हवाई हल्ले चढविले. या हवाई हल्ल्यांमध्ये ८५ हून अधिक तालिबानी ठार केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. लश्करगहमधील कारवाईत ठार झालेल्यांमध्ये अल कायदाच्या तीन दहशतवाद्यांचा समावेश असून हे तिघेही पाकिस्तानी नागरिक असल्याचा आरोप अफगाणी संरक्षण मंत्रालयाने केला. त्याचबरोबर गझनी येथील कारवाईत लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. तालिबानने देखील गेल्या चोवीस तासात कुंदूझ आणि सार-ए-पूल या प्रांतांच्या राजधानीचा ताबा घेतला. तसेच कंदहार येथील विमानतळावर रॉकेट हल्ले चढविले.

अमेरिकेने आधीच आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच अमेरिका अफगाणिस्तानातील हवाई मोहीम तीव्र करणार असल्याचा दावा केला जातो. पण अमेरिकेचे तालिबानवरील हे हवाई हल्ले ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. कारण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केल्यानुसार, ३१ ऑगस्टनंतर अमेरिका अफगाणिस्तानकडे पाठ फिरविल. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी काय करतील? त्यापुढे तालिबान राजधानी काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेईल, असा दावा पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी करीत आहेत. पण अफगाणिस्तानवरील तालिबानचा ताबा रोखण्यासाठी अमेरिका हवाई हल्ले सुरू राहणार आहेत, याला कुठलाही कालमर्यादा असू शकत नाही, असे समोर येत आहे. त्यामुळे अमेरिकेचे तालिबानवरील हल्ले थांबतील, हे पाकिस्तान तसेच तालिबानचेही दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे.

leave a reply