अमेरिकेत कोरोनाव्हायरसचे ६६ हजार बळी

वॉशिंग्टन/मॉस्को – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने अमेरिकेत १४३५ जणांचा बळी घेतला असून या देशात कोरोनाच्या साथीने दगावलेल्यांची संख्या ६६ हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेबरोबर, रशिया, युरोप तसेच सौदी अरेबिया, ब्राझिल या देशांमधील कोरोनाच्या रुग्णांची वाढ लक्षणीय स्तरावर पोहोचली आहे.

कोरोनाव्हायरसच्या जगभरातील बळींची संख्या २,४५,४९१ वर पोहोचली असून पन्नास हजाराहून अधिक जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे बोलले जाते. तर जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३५ लाखांच्या पुढे पोहोचली असून यापैकी ११,३२,६६७ जणांनी या साथीवर मात केली आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनाच्या ११,६५,८६८ रुग्णांची नोंद झाली आहे. न्यूजर्सी, फ्लोरीडा आणि कनेक्टीकट या प्रांतातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत चालली आहे. मात्र टेक्सास, अरिझोना व टेनेसी प्रांतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे इशारे दिले जात आहेत. टेक्सासमध्ये शनिवारी या साथीचे एक हजार रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाव्हायरसच्या साथीचे इटलीमध्ये २८,७१० बळी गेले असून गेल्या चोवीस तासात या देशात ४७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी दीड हजाराहून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. इटलीची लोकसंख्या सहा कोटीच्या आसपास असून आत्तापर्यंत १४ लाख जणांची तपासणी झाली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात ३२८ जणांचा बळी गेला असून या देशात कोरोनाच्या साथीत दगावलेल्यांची संख्या २८,४८९ वर पोहोचली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या साथीबाबत मुलाखत देताना, कोरोनाबाबत ब्रिटनच्या जनतेला सावध केले. त्याचबरोबर या साथीच्या प्रादूर्भावाने आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर ‘स्टॅलिन प्रमाणे’ आकस्मिक योजनाही तयार ठेवली होती, असे पंतप्रधान जॉन्सन म्हणाले.

रशियातही या साथीने जोर पकडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने ५८ रशियन नागरिकांचा बळी घेतला आहे. याबरोबर रशियात या साथीने मृत्यू झालेल्यांची संख्या १,२८० वर गेली आहे. तर गेल्या चोवीस तासात रशियात या साथीचे १०,६३३ नवे रुग्ण सापडले असून सध्या रशियामध्ये १,३४,६८७ कोरोनाबाधित आहेत. आपल्या देशातील या परिस्थितीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘रशियातील परिस्थिती गंभीर असून अजून आपल्या देशात या साथीचा उद्रेक व्हायचा आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जनतेला बजावले आहे.

दरम्यान, ब्राझिलमध्ये या साथीच्या रुग्णांची संख्या एक लाखाजवळ पोहोचली आहे. तर गेल्या चोवीस तासात मेक्सिकोमध्ये तेराशे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

leave a reply