उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 75 जणांचा बळी – 70 जखमी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात रविवारी तुफानी पाऊस सुरू असताना वीज कोसळण्याच्या निरनिराळ्या घटनांमध्ये 75 जणांचा बळी गेला आहे, तर 70 जण जखमी झाले आहे. राजस्थानच्या जयपूरमधील अम्बेर किल्ल्यांच्या टेहळणी बुरुजावर वीज कोसळल्याने येथे पर्यटनासाठी आलेल्या 12 जणांचा बळी गेला. यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात वीज कोसळून गेलेल्या बळींच्या घटनांवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान सहाय्य निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची, जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे.

वीजउत्तरेकडील राज्यांमध्ये व मध्य भारतात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामानखात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार मध्य व उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कित्येक ठिकाणी विज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी एका दिवसात वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 75 जणांचा बळी गेला. वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक बळी हे उत्तर प्रदेशात गेले आहे. उत्तर प्रदेशात वीज कोसळण्याच्या निरनिराळ्या घटनांमध्ये 41 जण दगावले, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील 16 निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 250 हून अधिक प्राण्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश सरकारने या घटनांमध्ये बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

राजस्थान जयपूरमध्ये अम्बेर किल्ल्यावर सर्वात विदारक अपघात झाला. येथे विकएन्ड आणि पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांनी या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्यावर कित्येक पर्यटक किल्ल्यावरून खाली उतरून परतले. मात्र सुमारे 35 पर्यटक हे किल्ल्यावर टेहळणी बुरुजाच्या छताखाली सेल्फीसाठी थांबून राहिले. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांना येथून हलवणेही कठिण बनले. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.

वीजसायंकाळी सात वाजता या टेहळणी बुरुजावर 15 ते 20 मिनीटात दोन वेळा वीज कोसळली. यामध्ये हे पर्यटक होरपळले. विजेच्या तडाख्याने हे पर्यटक बुरुजाखाली झाडीत फेकले गेले. यामध्ये 12 जण ठार झाले आहेत. तर 11 जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्रीपासून सोमवारी दिवसभर येथे बचावकार्य सुरू होते. दरीतील झाडीतून मृतदेह शोधून काढण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. याशिवाय राजस्थानच्या कोटा, झलवार, बारन, ढोलपूर, सवाई माधवपूर आणि टोंक जिल्ह्यातही वीज कोसळण्याच्या घटना घडल्या.

रविवारी एका दिवसात राजस्थानात वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 23 जणांचा बळी गेला, 27 जण जखमी झाले. याशिवाय 16 गुरेही या घटनांमध्ये ठार झाली आहेत. राजस्थान सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

मध्य प्रदेशमध्येही चोवीस तासांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 11 जण दगावले आहेत, तर 13 जण गंभीररित्या होरपळले आहेत. ग्वाल्हेर आणि चंबळमध्ये घडलेल्या घटनांमध्येच सात जणांचा बळी गेला आहे. रविवारी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात घडलेल्या वीज कोसळण्याच्या घटना म्हणजे अलिकडील काळात नोंदविण्यात आलेली या राज्यांमधील अशाप्रकारची सर्वात वाईट आपत्ती असल्याचा दावा या राज्यांकडील नोंदीनुसार केला जात आहे.

leave a reply