इराणमध्ये लोकशाही आणण्यासाठी इस्रायलने सहाय्य करावे

- हद्दपार इराणी जनतेची इस्रायलकडे मागणी

पॅरिस – ‘इराणमधील लोकशाहीच्या समर्थनासाठी आणि दहशतवादविरोधी कारवाईसाठी इस्रायलच्या बेनेट सरकारने आम्हाला पाठिंबा द्यावा. कारण अणुबॉम्ब मिळविण्याच्या तयारीत असलेली इराणमधील कट्टरपंथी आणि मध्ययुगीन राजवट उलथून टाकण्याची आवश्यकता आहे’, अशी मागणी हद्दपार इराणी कार्यकर्त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना पाठविलेल्या एका पत्राद्वारे केली. त्याचबरोबर खामेनी-राईसी यांची राजवट उलथून लावल्यानंतर भविष्यात इराणमध्ये प्रस्थापित होणारे लोकशाही सरकार आणि इस्रायलमध्ये ‘सायरस अकॉर्ड’ केला जाईल, असेही या पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

इराणमध्ये लोकशाही आणण्यासाठी इस्रायलने सहाय्य करावे - हद्दपार इराणी जनतेची इस्रायलकडे मागणी1979 सालच्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये प्रस्थापित झालेल्या राजवटीच्या विरोधात दरवर्षी अमेरिका व युरोपमध्ये हद्दपार इराणी जनतेकडून निदर्शने आयोजित केली जातात. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ‘नॅशनल कौंसिल ऑफ रेझिस्टंस ऑफ इरान’ या लोकशाहीवादी संघटनेकडून मोठ्या सभेचे आयोजन केले जाते. या सभेमध्ये अमेरिका, युरोपिय देशांचे नेते सहभागी होतात. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांची राजवट उधळून लावून देशात लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी दरवर्षी या हद्दपार इराणी कार्यकर्त्यांकडून केली जाते.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, ही बैठक होऊ शकली नाही. तर यावर्षी देखील जर्मनीची राजधानी बर्लिन येथे छोट्या प्रमाणात हद्दपार इराणी कार्यकत्यांनी आयातुल्ला खामेनी आणि भावी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांच्या राजवटीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. इराणमध्ये लोकशाही आणण्यासाठी इस्रायलने सहाय्य करावे - हद्दपार इराणी जनतेची इस्रायलकडे मागणीराईसी हे खामेनी यांचे हस्तक आणि राजकीय विरोधकांचे मारेकरी असल्याचा आरोप या निदर्शनांमध्ये झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने राईसी यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी निदर्शकांनी केली.

हद्दपार इराणींच्या एका गटाने इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना पत्र पाठविले. गेली चार दशके इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणारी इराणमधील मध्ययुगीन राजवट उलथून, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बेनेट यांनी आपल्याला सहाय्य करावे, असे आवाहन यात करण्यात आले. त्याचबरोबर इराणी जनतेच्या समृद्धीसाठी आणि ज्यूधर्मियांच्या सुरक्षेसाठी अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचत असलेल्या इराणला रोखण्यासाठी इस्रायलचे सहाय्य आवश्यक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. इस्रायलच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने या पत्रातील मजकूर प्रसिद्ध केला आहे.

leave a reply