ड्युरंड लाईनवर तालिबान व पाकिस्तानच्या लष्करात नवा संघर्ष

taliban-durand-lineइस्लामाबाद – ड्युरंड लाईनच्या वादावरुन तालिबान आणि पाकिस्तानच्या लष्करामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. पाकिस्तानने ड्युरंड लाईनच्या सीमेवर तोफा आणि रणगाडे तैनात केले. खैबर-पख्तूनख्वा प्रांतात तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे दोन जवान मारले गेल्याची कबुलीही पाकिस्तानने दिली. तर तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानने युक्रेनकडून खरेदी केलेला रणगाडा उद्ध्वस्त झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराविरोधात कारवाई करण्यासाठी तालिबानने ‘तेहरिक’ला पूर्ण मोकळीक दिल्याच्या बातम्या येत आहेत.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येत असताना पाकिस्तानात जल्लोष झाला होता. मात्र त्यावेळी पाकिस्तानच्या काही जबाबदार विश्लेषकांनी तालिबानच्या विरोधात सज्जड इशारे दिले होते. तालिबानमुळे अफगाणिस्तानला लागून असलेली पाकिस्तानची सीमा असुरक्षित होईल, असे या विश्लेषकांचे म्हणणे होते. तालिबानने ही शक्यता प्रत्यक्षात उतरविली असून ड्युरंड लाईनवर तालिबानकडून पाकिस्तानी लष्करावर हल्ले सुरू झाले आहेत. यात पाकिस्तानी जवानांचे बळी जात असून यामुळे पाकिस्तानात अस्वस्थता पसरली आहे.

conflict between the Taliban and Pakistan's army13 नोव्हेंबर रोजी तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानचा एक जवान ठार झाला होता. यानंतर पाकिस्तानने ड्युरंड लाईनवरील ‘फ्रेंडशिप गेट’ बंद ठेवून अफगाणींना आपल्या देशात प्रवेश देण्याचे नाकारले होते. आता खैबर-पख्तूनख्वा प्रांतात तालिबानने पाकिस्तानचे आणखी दोन जवान मारल्याच्या बातम्या येत असून पाकिस्तानी लष्कराचा रणगाडादेखील तालिबानने उडवून दिल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा अफगाणिस्तानकडे उपस्थित करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताझ झाहरा बलोच यांनी ही माहिती दिली. तसेच ड्युरंड सीमेसंदर्भात पाकिस्तान वेगवेगळ्या स्तरावर अफगाणिस्तानशी चर्चा करीत असल्याचे मुमताझ बलोच म्हणाल्या. याच्या आधीच्या चर्चेत अफगाणिस्तानने पाकिस्तानी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर खेद व्यक्त केला होता, असेही मुमताझ बलोच यांनी म्हटले आहे. पण प्रत्यक्षात तालिबानने पाकिस्तानच्या विरोधात कठोर धोरण स्वीकारल्याचे समोर येत आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या अफगाणिस्तानलगतच्या सीमाभागात कारवाई करण्यासाठी ‘तेहरिक-ए-तालिबान या आपल्या गटाला कारवाईची पूर्ण मोकळीक तालिबानने दिल्याचे समोर आले आहे.

leave a reply