सिरियातील तुर्कीच्या हल्ल्यांमुळे ‘आयएस’चे हजारो दहशतवादी मुक्त होतील

पेंटॅगॉनच्या प्रवक्त्यांचा इशारा

general patrick ryderवॉशिंग्टन – ‘तुर्कीने सिरियात सुरू केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे येथे तैनात अमेरिकी जवानांची सुरक्षा धोक्यात येत आहे. त्याचबरोबर सिरियातील कुर्दांच्या कैदेत असलेले आयएसचे हजारो दहशतवादी तुर्कीच्या हल्ल्यांमुळे मुक्त होतील’, असा इशारा पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट्रिक रायडर यांनी दिला. सिरियातील तुर्कीचे हल्ले आयएससाठी उपकारक ठरतील, अशी चिंता अमेरिका तसेच सिरियातील विश्लेषक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, तुर्कीच्या हल्ल्यांवर संताप व्यक्त करून सिरियन कुर्दांनी आयएसविरोधातील कारवाई रोखण्याची घोषणा करून आपल्या विरोधकांना इशारा दिल्याचे दिसते.

19 ते 23 नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये तुर्कीच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या उत्तरेकडील भागात भीषण हल्ले चढविले. येथील 47 ठिकाणांवर केलेल्या कारवाईत 15 नागरिक आणि अमेरिकेने प्रशिक्षित केलेले ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’च्या सहा जवानांचा बळी गेला होता. तर तुर्कीने 326 दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला होता.

turkey syria strikeपण अमेरिकेने सिरियासाठी नेमलेल्या विशेष प्रतिनिधी सिनम मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीने रुग्णालयाजवळ हल्ले चढविले. तर आयएसचे दहशतवादी कैद असलेल्या तुरुंगाजवळ हवाई हल्ला झाला. यामध्ये तुरुंगाचे नुकसान होऊन आयएसचे दहशतवादी फरार झाले असते तर विचारही करता येणार नाही, असे संकट सिरियावर कोसळले असते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने तुर्कीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी सिनम यांनी केली.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल रायडर यांनी देखील सिरियातील तुर्कीच्या हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. गेल्या नऊ दिवसांमध्ये तुर्कीने तिसऱ्यांदा सिरियातील अमेरिकी लष्कराच्या तळाजवळ हल्ले चढविले. तुर्कीच्या या हल्ल्यांमुळे अमेरिकन जवानांची सुरक्षा धोक्यात येईल. त्याचबरोबर येथे कैद असलेले 10 हजार आयएसचे दहशतवादी फरार होतील, असा इशारा रायडर यांनी दिला.

तुर्कीश वंशाचे राजकीय विश्लेषक उझय बुलूत यांनी देखील सिरियातील हल्ल्यांमुळे तुर्की मोठ्या संकटाला आमंत्रण देत असल्याचे बजावले. सिरियातील शहरे तुर्कीच्या ताब्यात जाईल. पण यामुळे आयएसच्या विरोधात यशस्वी कारवाई करणाऱ्या कुर्द संघटना कमजोर पडून आयएस पुन्हा उभी राहील, असा इशारा बुलूत यांनी दिला.

तुर्कीचे हे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने प्रयत्न करावे, असे आवाहन सिरियन कुर्दांनी केले होते. पण बायडेन प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे संतापलेल्या सिरियन कुर्दांनी आयएसविरोधातील कारवाई रोखण्याचे जाहीर केले आहे. ‘अमेरिका व युरोपिय देशांच्या लष्करी आघाडीला आयएसविरोधी संघर्षात सहाय्य करणाऱ्या कुर्दांवरच तुर्कीचे लष्कर हल्ले चढवित आहेत. त्यामुळे आयएसविरोधी कारवाई रोखण्यात आली आहे’, असे कुर्दांचे नेते मझलूम अब्दी यांनी जाहीर केले.

13 नोव्हेंबर रोजी इस्तंबूल शहरात झालेल्या कारबॉम्बस्फोटासाठी तुर्कीने पीकेके, वायपीजी, एसडीएफ या कुर्द संघटनांना जबाबदार धरले आहे. पण तुर्की व सिरियातील या सर्व कुर्द संघटनांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच इस्तंबूल हल्ल्याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव ‘पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ या कुर्दांच्या संघटनेने तुर्कीच्या संसदेत केला. एर्दोगन यांच्या राजवटीने कुर्दांचा हा प्रस्ताव धुडकावून सिरियात सैन्य घुसविणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, तुर्कीने सिरियात हल्ले चढवू नये, असे रशियानेही बजावले आहे. तुर्कीच्या हल्ल्यांचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियाने दिला होता. पण यानंतरही तुर्की सिरियातील हल्ल्यांवर ठाम आहे.

leave a reply