अफगाणी राजदूतांच्या मुलीच्या अपहरणाचे तीव्र पडसाद उमटले

- पाकिस्तानच्या राजदूतांना अफगाणिस्तानचे समन्स

तीव्र पडसादकाबुल/इस्लामाबाद – पाकिस्तानमधील अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांची मुलगी सिलसिला हिच्या अपहरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शनिवारी अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानी राजदूतांना समन्स पाठवून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. अफगाणी जनतेतही याविरोधात संतापाची भावना आहे. राजधानी काबुलमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने करून अफगाणी जनतेने आपला असंतोष व्यक्त केला. तर अफगाणिस्तानातील महिला संसद सदस्यांनी पाकिस्तानी संसदेला खरमरीत पत्र पाठवून राजदूतांच्या मुलीचे अपहरण ही राजनैतिक संकेतांचा भंग करणारी बाब असल्याचा ठपका ठेवला आहे.

शुक्रवारी दुपारी अफगाणी राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांची मुलगी असलेल्या 26 वर्षाच्या सिलसिला अलीखिल हिचे सुपरमार्केटमधून घरी येत असताना अपहरण करण्यात आले. काही तासांनी तिची सुटका करण्यात आली. पण त्याआधी सिलसिला हिचा छळ करण्यात आला. यामुळे सुटका झाल्यानंतर सिलसिलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून अफगाणिस्तान सरकारने याविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली. शनिवारी दुपारी अफगाण सरकारने पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांना समन्स धाडले. यावेळी सिलसिला अलीखिलच्या अपहरणाची अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली. त्याचवेळी सदर घटनेबद्दल तीव्र निषेधही नोंदविण्यात आला. पाकिस्तानमधील अफगाणी राजनैतिक अधिकारी व कुटुंबियांच्या सुरक्षेवरून अफगाणिस्तानने पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे.

अफगाणी संसदेतील महिला सदस्यांनीही अपहरण व छळाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. संसद सदस्यांनी पाकिस्तानी संसदेला पत्र पाठविले असून त्यात सदर घटनेची तीव्र शब्दात निंदा करण्यात आली आहे. अपहरणाची घटना राजनैतिक संकेतांचा भंग ठरतो, याची आठवण अफगाणी महिला संसद सदस्यांनी पाकिस्तानच्या संसदेला करून दिली. पाकिस्तानला जर अफगाणिस्तानबरोबरील संबंध तोडायचे असतील तर त्यासाठी सर्वमान्य प्रोटोकॉल्स आहेत, अशा खरमरीत भाषेचा वापर या पत्रात करण्यात आला आहे. पाकिस्तानी संसद सदस्यांनी आपल्या यंत्रणांवर दबाव टाकावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. एका मुलीचे अपहरण व छळ हा मानवाधिकारांवरील हल्ला असल्याची जाणीव अफगाणिस्तानच्या महिला संसद सदस्यांनी करून दिली.

सिलसिलाच्या अपहरणानंतर अफगाणी जनता पाकिस्तानवर संतापलेली आहे. रविवारी अफगाणी नागरिकांनी काबुलमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर तीव्र निदर्शने केली. यावेळी पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. अफगाणिस्तान सरकारने अपहरणाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघटनेत उपस्थित करण्याची तयारी केली आहे. अफगाणी राजदूतांच्या मुलीच्या अपहरणाच्या घटनेनंतर पाकिस्तानमधील भारतीय दूतावास व उच्चायुक्त कार्यालयांना ‘हाय अ‍ॅलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद अहमद यांनी, राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांच्या मुलीच्या अपहरणाची केस 72 तासांमध्ये सोडविण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यासंदर्भात निर्देश दिल्याचेही शेख रशिद अहमद यावेळी म्हणाले. मात्र या अपहरणामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाल्याचे दिसत आहे. यामुळे पाकिस्तानची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची खंत या देशातील पत्रकारांनी व्यक्त केली आहे.

leave a reply