मुंबईमध्ये तुफानी पावसाचे 31 बळी

- चेंबूर आणि विक्रोळीमध्ये दरड कोसळली

मुंबईच्या आकाशात एव्हरेस्टपेक्षा दुप्पट उंचीचे ढग

मुंबई – मुंबईत शनिवारच्या रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत झालेल्या विक्रमी पावसाने मुंबईकरांना 26 जुलैची पुन्हा आठवण करून दिली. जोरदार वार्‍यासह झालेल्या या पावसाने दरड कोसळण्याच्या, संरक्षक भींत पडण्याच्या घटना घडल्या असून यामध्ये 31 जणांचा बळी गेला. चेंबूरमध्ये दरड कोसळून झालेल्या घटनेमध्ये मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. मुंबईत एका दिवसात सुमारे 300 एमएम पावसाची नोंद झाली आहे. काही भागात केवळ तीन तासात 200 एमएमपेक्षा जास्त पाऊस कोसळला. या अतिवृष्टीमुळे मुंबईत कित्येक भागत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

मुंबईत व कोकण किनारपट्टी क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरात किनारपट्टीनजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. गुरुवारी मुंबईत 253 एमएम, शुक्रवारी 235 एमएम आणि शनिवारी रात्री 270 एमएम पाऊस झाला. तीन दिवसात मुंबईत 750 एमएम पाऊस झाला असून शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत झालेला पाऊस सामान्यापेक्षा कितीतरी जास्त होता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईमध्ये तुफानी पावसाचे 31 बळी - चेंबूर आणि विक्रोळीमध्ये दरड कोसळलीवीजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे कित्येक सखल भाग पाण्याखाली गेले. मिठी नदीसह इतर नालेही भरून वाहू लागले. काही भागात एका तासातच 150 एमएम इतका पाऊस झाला, तर काही ठिकाणी तीन तासात 200 ते 250 एमएम पाऊस झाला. मुंबई उपनगरांमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. दहिसर, चेंबूर, विक्रोळी, मरोळ, बोरिवली, कांदिवली भागात सर्वात जास्त पाऊस झाला. मात्र रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी व वाहतूक नव्हती. यामुळे नागरिकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले नाही. पण सखल भागात कित्येक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे या भागातील नागरिकांना भयंकर परिस्थितीला समोर जावे लागले. उपनगरातील काही रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.

या तुफानी पावसामुळे चेंबूरच्या माहूल येथील भारत नगर भागात भूस्खलन झाले. येथील डोंगर उतरावर वसलेल्या झोपड्यांवर दरडीचा मोठा भाग रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोसळला, तसेच येथील संरक्षक भिंतही कोसळली. या दुर्घटनेत 21 जणांचा बळी गेला. रात्रभर, तसेच रविवारी दिवसभर येथे बचावकार्य सुरू होते. राजावाडी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना यातील चार जणांचा मृत्यू झाला.

याशिवाय विक्रोळीतही दरड कोसळण्याची घटना घडली. रात्री अडीच सुमारास ही घटना घडली. सहा झोपड्यांवर दरडीचा मोठा भाग कोसळला. या घटनेत 9 जणांचा बळी गेला आहे. तसेव भांडूपमध्ये एक संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षिय अल्पवयीन मुलाचा त्याखाली दबून मृत्यू झाला.

मुंबईच्या आकाशात 60 हजार फुट उंचीचे ढग दिसून आल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे. एव्हरेस्टपेक्षा दुप्पट उंचीच्या या ढगातून जोरदार पाऊस झाला. असे ढग जुलै महिन्यात सामान्यत: दिसून येत नाहीत, असे हवामानखात्याने म्हटले असून 26 जुलै 2005 मध्ये दिसून आली तशी परिस्थितीत ढगांची होती, असेही हवामानखात्याच्या अधिकार्‍याने म्हटले आहे. 26 जुलै रोजी चोवीस तासात 900 एमएमपेक्षा जास्त झााला होता.

हवामानखात्याने येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अ‍ॅलर्ट दिला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. याशिवाय गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत दरड कोसळून गेलेल्या बळींबंद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची, तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनेही मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने मुंबईतील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा ठप्प

शनिवारी रात्री मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. त्यामुळे रविवारी मुंबईतील बहुतांश भागातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने नागरिकांनी पाणी उकळून प्यावे अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पाणी शिरले. त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील बंद केला आहे. भांडुपच्या याच केंद्रातून मुंबईतील बहुतांश भागात पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आल्याने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला होणारा पाणी पुरवठा रविवारी खंडित झाला. प्रामुख्याने शहर आणि पश्‍चिम उपनगरात पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये देखील काही भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.

येथील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पाण्याचा उपसा करण्यात आल्यानंतर या भागातील स्वच्छता करण्यात येईल. त्यानंतर यंत्रणांची पहाणी करून दुरुस्ती करून तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

leave a reply