अफगाणी लष्कराच्या कारवाईत ९३ तालिबानी ठार

काबुल – अफगाणिस्तानच्या संरक्षणदलाने गेल्या ४८ तासात देशभरात केलेल्या कारवाईत ९३ तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईत तीन आत्मघाती हल्लेखोरांचाही समावेश होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचा दावा अफगाणी लष्करी अधिकारी करीत आहेत. अफगाणी संरक्षणदलाच्या या कारवाईचा सूड घेण्यासाठी तालिबानने शुक्रवारी दोन आत्मघाती हल्ले घडविले. यामध्ये एका अफगाणी जवानाचा बळी गेला. दरम्यान, अफगाण सरकारने तालिबानशी वाटाघाटी कराव्या, यासाठी अमेरिका अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्यावर दबाव टाकत आहे. पण तालिबानने हिंसाचार रोखलेला नाही, असे सांगून अफगाण सरकारने तालिबानविरोधी कारवाई सुरू ठेवली आहे.

अफगाणी लष्कराने बुधवार व गुरुवार असे सलग दोन दिवस कंदाहर, झाबुल, फरयाब प्रांतात तालिबानवर मोठी कारवाई केली. अफगाणी लष्कर आणि हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सनी कंदहार प्रांताच्या अरघानदाब आणि झेराई जिल्ह्यात ३१ तर झाबुल प्रांताच्या मिझान आणि शहर-ए-सफा जिल्ह्यातील कारवाईत ३५ तालिबानींना ठार केले. या कारवाईत १० तालिबानी जखमी झाले. तर अफगाणी लष्कराने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व तालिबानची वाहने जप्त केली.

या कारवाईनंतर मिझान जिल्हा तालिबानपासून मुक्त केल्याची घोषणा अफगाणी लष्कराने केली. त्याचबरोबर या जिल्ह्यातील नागरिक व जवानांना लक्ष्य करण्यासाठी तालिबानने पेरलेली भुसुरूंग देखील निकामी करण्यात आली आहेत. तर फरयाब प्रांतात अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये सलग दोन दिवस संघर्ष सुरू होता. याच प्रांतात तालिबानचे तीन आत्मघाती दहशतवादी मोठा घातपात घडविण्याच्या तयारी होते. पण अफगाणी हेलिकॉप्टर्सनी केलेल्या कारवाईत १२ तालिबानी ठार केले. यामध्ये तीन आत्मघाती दहशतवाद्यांचा समावेश होता.

गेल्या आठवड्याभरात अफगाणी लष्कराने तालिबानच्या विरोधात केलेल्या कारवाईत जवळपास दीडशे तालिबानींचा खातमा केला आहे. अफगाणी लष्कराला या कारवाईत अमेरिका किंवा नाटोच्या लष्कराचे सहाय्य मिळाले का, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. या कारवाईमुळे संतापलेल्या तालिबानने शुक्रवारी मैदान वारदाक प्रांतात अफगाणी लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या तळाजवळ दोन आत्मघाती हल्ले चढविले. यानंतर अफगाणी स्पेशल फोर्सेस व तालिबानमध्ये गोळीबार सुरू झाला. यामध्ये एका जवानाचा बळी गेला.

अफगाण सरकारने तालिबानबरोबर वाटाघाटी सुरू केल्या नाहीत, तर १ मेच्या आधी अमेरिका अफगाणिस्तानातून आपले लष्कर पूर्णपणे माघारी घेईल. त्यानंतर तालिबान अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावाचून राहणार नाही, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला होता. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई देखील अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी गनी सरकारवर दबाव टाकत आहेत.

पण गेल्या काही महिन्यांपासून तालिबानचा अफगाणिस्तानातील दहशतवाद वाढल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष गनी करीत आहेत. तालिबानने माध्यमे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही महिला पत्रकार राजीनामे देऊ लागल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेने तालिबानला पुन्हा सत्तेवर आणले तर आपली धडगत नसेल, पुन्हा अफगाणिस्तानचे तालिबानीकरण होईल, अशी भीती अफगाणी जनता व्यक्त करीत आहेत.

leave a reply