फ्रान्स, ग्रीस व सायप्रसबरोबर इस्रायलचा संयुक्त नौदल सराव

- तुर्कीविरोधी मोर्चेबांधणीतील महत्त्वाचा टप्पा

जेरुसलेम/अथेन्स/पॅरिस – इस्रायलने भूमध्य सागरी क्षेत्रात फ्रान्स, ग्रीस व सायप्रसबरोबर संयुक्त नौदल सराव केल्याचे उघड झाले आहे. इस्रायलच्या संरक्षणदलांनी यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली असून गुरुवारी सराव संपन्न झाल्याचे जाहीर केले. ‘नोबल दिना’ नावाने आयोजित या सरावात इस्रायलच्या युद्धनौकेबरोबरच पाणबुडीही सहभागी झाली होती. गेल्या काही वर्षात भूमध्य सागरी क्षेत्रात तुर्कीच्या कारवाया वाढल्या असून या पार्श्‍वभूमीवर हा संयुक्त सराव महत्त्वाचा मानला जातो.

गेल्या वर्षी इस्रायलने ग्रीस व सायप्रस या देशांसह युरोपबरोबर ‘ईस्टमेड पाईपलाईन’ या महत्त्वाकांक्षी इंधनप्रकल्पावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गेल्याच महिन्यात इस्रायलने इजिप्तबरोबरही इंधनवाहिनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. इस्रायल व ग्रीसदरम्यान नुकताच संरक्षणकरारही झाला आहे. इस्रायलच्या या वाढत्या हालचाली इस्रायलकडून तुर्कीला शह देण्याच्या योजनेचा भाग असल्याचे दिसते. भूमध्य सागरातील नवा सराव त्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे समोर येत आहे.

इस्रायलच्या नौदलाने गेल्या आठवड्यापासून सायप्रसच्या पश्‍चिम भागात असणार्‍या भूमध्य सागरी क्षेत्रात नौदल सरावाला सुरुवात केली. या सरावात फ्रान्स, ग्रीस व सायप्रसचे नौदलही सहभागी झाले होते. या सरावात, ‘अँटी सबमरिन प्रोसिजर्स’, ‘बॅटल बिटवीन शिप्स’ आणि ‘सर्च अ‍ॅण्ड रेस्न्यू’चा सराव करण्यात आला, अशी माहिती इस्रायली नौदलाचे प्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एयाल हारेल यांनी दिली. समान हितसंबंध जपणार्‍या परदेशी आरमारांबरोबर सहकार्य मजबूत करण्यासाठी असे सराव अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असेही रिअर अ‍ॅडमिरल एयाल हारेल यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून तुर्कीकडून आखात तसेच भूमध्य सागरी क्षेत्रात आक्रमक हालचाली सुरू आहेत. गेल्या वर्षी तुर्कीने ग्रीसच्या हद्दीतील बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा करून इंधनक्षेत्रात संशोधन करण्यासाठी जहाजे व युद्धनौका पाठविल्या होत्या. त्यानंतर भूमध्य सागरी क्षेत्रातील तणाव चिघळला असून ग्रीसने तुर्कीला रोखण्यासाठी इतर देशांचे सहकार्य घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात अमेरिका व युरोपिय देशांव्यतिरिक्त इस्रायल, इजिप्त व संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांचा समावेश आहे.

इस्रायल व तुर्कीमधील संबंधही सध्या तणावपूर्ण आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याकडून पॅलेस्टाईन, हमास तसेच इराणबाबत घेण्यात आलेली भूमिका याचे मुख्य कारण मानले जाते. गेल्या काही दिवसात तुर्कीकडून संबंध सुधारण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी इस्रायलने त्याला विशेष प्रतिसाद दिलेला नाही. उलट तुर्कीची आक्रमकता रोखण्यासाठी इस्रायल अधिक वेगाने पावले उचलणार असल्याचे संकेत या नौदल सरावातून मिळत आहेत.

leave a reply