11 लाख अफगाणी मुलांना तीव्र कुपोषणाचा सामना करावा लागेल

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

कुपोषणाचा सामनाइस्लामाबाद – रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्नधान्याच्या किंमती कडाडल्या आहेत. विकसनशील देशांप्रमाणे पाश्चिमात्य देशांसमोरही अन्नसंकट उभे राहिले आहे. पण याचा सर्वात मोठा परिणाम अफगाणिस्तानवर होत असून येथील अन्नटंचाई भीषण बनल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला. या वर्षी अफगाणिस्तानातील पाच वर्षांखालील 11 लाख मुलांना तीव्र कुपोषणाचा सामना करावा लागेल, असे राष्ट्रसंघाने बजावले आहे.

गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चिमात्य देशांनी अफगाणी जनतेला भीषण उपासमारीचा सामना करावा लागेल, असे बजावले होते. त्याचबरोबर अमेरिका, युरोपिय देश आणि संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणी जनतेसाठी तातडीच्या आर्थिक आणि मदतसहाय्याची घोषणा केली होती. पण यानंतर अफगाणी जनतेच्या उपासमारीचा प्रश्न सुटलेला नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या अहवालातून समोर आले आहे.

अफगाणिस्तानातील गरीबी आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यातच युक्रेनमधील युद्धामुळे अफगाणिस्तानला मिळणाऱ्या थोड्याफार आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ देखील आटला आहे, याकडे राष्ट्रसंघाच्या अहवालाने लक्ष वेधले. यामुळे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेल्या अफगाणी कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट खडे ठाकले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘युनिसेफ’ने तयार केलेल्या अहवालानुसार, यावर्षी पाच वर्षांखालील 11 लाख अफगाणी मुलांना तीव्र कुपोषणचा सामना करावा लागू शकतो.

2018 सालच्या तुलनेत अफगाणिस्तानातील कुपोषित मुलांची संख्या दुपटीने वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. यासाठी युनिसेफने मार्च महिन्यात रुग्णालयात दाखल झालेल्या कुपोषित मुलांची नोंद केली. 2020 सालच्या मार्च महिन्यात पाच वर्षांखालील 16 हजार कुपोषित मुलांना अफगाणी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले होते. गेल्या वर्षी ही संख्या 18 हजार इतकी होती. तर या वर्षी अशा कुपोषित मुलांची संख्या 28 हजारांच्याही पलिकडे गेल्याची गंभीर चिंता युनिसेफने व्यक्त केली.

दरम्यान, अफगाणिस्तानातील वाढत्या कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अफगाणिस्तानात मोठा राजकीय बदल होणे अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा या देशातील कुपोषण, अन्नाच्या दुर्भिक्ष्याचे संकट येत्या काळात अधिकाधिक उग्ररूप धारण करील, असा इशारा राष्ट्रसंघ देत आहे.

leave a reply