अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या ड्युरंड लाईनवरील तणाव अधिकच वाढला

- तालिबान व तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे दहा जण ठार

अफगाणिस्तान-पाकिस्तानइस्लामाबाद – चमन सीमाभागात चढविलेल्या हल्ल्यांसाठी तालिबानने माफी मागितल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री यांनी केला होता. पण त्यात तथ्य नसल्याचे समोर येत आहे. तालिबानने चमन सीमेवरील पाकिस्तानी लष्करावरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली असून गुरुवारच्या हल्ल्यात पाकिस्तानचा एक जवान ठार तर 15 जण जखमी झाले.

या हल्ल्यांतर तालिबानच्या मोटारींचे मोठे पथक चमन सीमेच्या दिशेने रवाना झाल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. बुधवारी उत्तर वझिरिस्तानात तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या आत्मघाती हल्ल्यात नऊ जवानांचा बळी गेला. याबरोबरच लक्की मारवात भागात ‘मजिलीस-ए-अस्कारी’ या नव्या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानी हेराचे शिरकाण करुन त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अफगाणिस्तानात सैन्य घुसविण्याची तयारी करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करासमोरील आव्हाने यामुळे वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तानगेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्दाक-चमन सीमेतून पाकिस्तानात दाखल होणाऱ्या पश्तू जनतेचा छळ करण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानचे लष्कर ड्युरंड सीमावादाचा सूड पश्तू जनतेवर काढत असल्याचा आरोप पश्तू नेत्यांनी केला होता. अशा परिस्थितीत चार दिवसांपूर्वी तालिबानने स्पिन बोल्दाक-चमन सीमेवर केलेल्या गोळीबारात व मॉर्टर हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे सहा जवान ठार झाले तर 16 जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानची नंबर वन आर्मी कुठे आहे, असा प्रश्न संतप्त पाकिस्तानी नागरिकांनी केला होता.

पाकिस्तानच्या लष्कराने यावर बोलण्याचे टाळले होते. पण सोशल मीडियातून ही माहिती समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी सावरासावर करत तालिबानने याप्रकरणी माफी मागितल्याचे जाहीर केले. मात्र पाकिस्तानचे सरकार व लष्कर याबाबत थापेबाजी करीत असल्याचे उघड झाले. पाकिस्तानच्या यंत्रणांनी चमन भागातील रुग्णालयांना आणीबाणीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचे पत्र सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाले आहे. तर गुरुवारी तालिबानने चमन सीमेवर नव्याने हल्ला चढविला असून यात एक जवान ठार झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले आहे.

चमन सीमेवर तालिबानने हल्ले सुरू करण्याआधी बुधवारी उत्तर वझिरिस्तानच्या सरगरदान भागात दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात पाकिस्तानचे नऊ जवान मारले गेले. तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्याने हा स्फोट घडविल्याचा दावा केला जातो. पण तेहरिकने आत्मघाती हल्ले बंद केल्याचे पाकिस्तानातील काही पत्रकार लक्षात आणून देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला आव्हान देणाऱ्या ‘आयएस-खोरासान’च्या दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्याच आठवड्यात ‘आयएस’ने पेशावरमधील घरांच्या भिंतींवर संदेश कोरून पाकिस्तानचे सरकार व लष्कराला धमकावले होते.

दरम्यान, ‘पाकिस्तान तहफ्फूझ मुव्हमेंट-पीटीएम’ या पश्तू पार्टीने चमन सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या विरोधातच मोठ्या प्रमाणात निदर्शनांचे आयोजन केले होते. पाकिस्तानी लष्कर अल्पसंख्यांक पश्तू नागरिकांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप या निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी केला आहे.

leave a reply