अग्नी-5च्या चाचणीद्वारे भारताचा चीनला सज्जड इशारा

अग्नी-5नवी दिल्ली – सुमारे पाच हजार किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत मारा करणाऱ्या व अणुस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनचा बराचसा भूभाग येत असल्याची बाब माध्यमे लक्षात आणून देत आहेत. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मिळालेल्या या यशामुळे देशाची सुरक्षा अधिकच भक्कम झाल्याचे विश्लेषक सांगत आहेत. तर एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-5ची चाचणी करून चीनला सज्जड इशारा दिल्याचा दावा केला जातो.

गेल्या काही आठवड्यांपासून भारत महत्त्वाच्या क्षेपणास्त्राची चाचणी करणार असल्याचे दावे केले जात होते. मात्र याबाबतचे अधिक तपशील उघड करण्यात आले नव्हते. गुरुवारी संध्याकाळी अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडल्याची घोषणा करण्यात आली. चाचणीदरम्यान या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने सारे निकष यशस्वीरित्या पूर्ण केले. अणुस्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या व सुमारे पाच हजार किलोमीटर इतक्या अंतरावरील लक्ष्य नष्ट करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे यश नव्याने अधोरेखित झाले आहे.

तवांगच्या एलएसीवर भारत आणि चीनच्या लष्करामध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला आहे. अशा परिस्थितीत भारताने, चीनची राजधानी बीजिंगसह या देशाच्या बऱ्याचशा भूभागावर मारा करण्याची क्षमता अग्नी-5च्या चाचणीद्वारे सिद्ध केली. या क्षेपणास्त्राकडे असलेल्या या मारकक्षमतेमुळेच चीन अग्नी-5च्या या चाचणीकडे विशेष लक्ष ठेवून असल्याचे दावे केले जात होते. त्यामुळे या क्षेपणास्त्र चाचणीला मिळालेले यश अधिकच महत्त्वाचे ठरते.

याबरोबरच भारत अग्नी-6 क्षेपणास्त्राच्या चाचणीची तयारी करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आठ ते 10 हजार किलोमीटर इतक्या अंतरावर मारा करू शकते, असा दावा केला जातो. जमीनवरून तसेच पाणबुडीतून हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते, असे दावे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या बातम्या चीनला अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या होत्या. यासाठीच चीनने टेहळणी करणारी आपली जहाजे भारताच्या सागरी क्षेत्राजवळ पाठविली होती. मात्र काही काळापूर्वी चीनची ही जहाजे भारताच्या सागरी हद्दीजवळून परतीच्या प्रवासासाठी निघाल्याचे सांगितले जाते.

leave a reply