ड्युरंड सीमेवर अफगाण तालिबानचा पाकिस्तानच्या लष्कराशी संघर्ष

- सलग दुसऱ्या दिवशी तोर्खाम सीमा बंद

काबुल/पेशावर – गेल्या दोन दिवसांपासून अफगाण तालिबान आणि पाकिस्तानचे लष्करामध्ये संघर्ष सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी तालिबानने पाकिस्तानबरोबरची तोर्खाम सीमा बंद केली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांना अफगाणिस्तान जबाबदार असल्याचा ठपका पाकिस्तानने ठेवला होता. मात्र याला अफगाणिस्तान नाही, तर पाकिस्तानच आपल्या देशातील दहशतवाद्यांच्या कारवायांना जबाबदार असल्याचे तालिबानने बजावले आहे. इतकेच नाही तर अफगाणिस्तानची सुरक्षा व्यवस्था पाकिस्तानपेक्षाही उत्तम असल्याचा टोला तालिबानने लगावला आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील व्यापारासाठी काही मोजकेच चेक पोस्ट वापरले जातात. यामध्ये खैबर-पख्तूख्वामधील तोर्खाम तर बलोचिस्तानातील ‘स्पिन बोल्दाक’ चेक पोस्टचा समावेश आहे. या सीमेवरुन मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतूक केली जाते. पण गेल्या दोन दिवसांपासून तोर्खाम सीमा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या बेजबाबदार कारवाईमुळे हे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप तालिबानने केला.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या दिशेने गोळीबार केला. तालिबानने देखील पाकिस्तानच्या गस्तीपथकाच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये एक जवान जखमी झाल्याचा दावा केला जातो. या संघर्षाचे कारण समोर आलेले नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून सीमेवरील संघर्ष अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरू आहेत. पेशावर, क्वेट्टा आणि कराची या प्रमुख शहरांमध्ये पाकिस्तानी पोलीस जवानांना लक्ष्य केले जात आहे. यापैकी पेशावर येथील पोलिसांच्या मुख्यालयावर झालेल्या स्फोटासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ जबाबदार असल्याचा आरोप पेशावर पोलिसांनीच केला होता. तर कराची येथील पोलीस स्थानकात झालेल्या स्फोटाबाबतही तसाच संशय व्यक्त केला जातो.

या हल्ल्यांमागे तेहरिक-ए-तालिबान असल्याचा दावा पाकिस्तानचे लष्कर करीत आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने तेहरिक-ए-तालिबानवर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तान करीत आहे. गेल्या आठवड्यात म्युनिक सुरक्षा परिषदेत सहभागी झालेले पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी आपल्या देशातील दहशतवादासाठी अफगाणिस्तान जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. अफगाणिस्तानने या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही, तर हा दहशतवाद पाकिस्तानच्याही पलिकडे जाऊन इतर देशांना ग्रासल्यावाचून राहणार नाही, असा इशारा भुत्तो यांनी दिला होता.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने बिलावल भुत्तो यांचा हा आरोप फेटाळला. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तानातील दहशतवादासाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरले जाऊ नये. अफगाणिस्तान आपल्या सुरक्षेसाठी सक्षम असून पाकिस्तानने स्वत:च्या अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याचे थांबवावे, असे तालिबानने पाकिस्तानला सुनावले आहे.

leave a reply