रशियन संसदेतील भाषणात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून युक्रेन मोहिमेच्या समर्थनासह पाश्चिमात्यांवर जोरदार टीकास्त्र

RUSSIA-UKRAINE-CONFLICT-POLITICSमॉस्को – युक्रेन व त्याच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या पाश्चिमात्य आघाडीने युद्धाला सुरुवात केली असून रशिया आपल्या सामर्थ्याच्या बळावर या युद्धाची अखेर करील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. रशियाविरोधी संघर्षात पाश्चिमात्य देश कोणाचाही, अगदी सैतानाचाही वापर करु शकतात, अशी जळजळीत टीकाही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली. रशियाच्या संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात पुतिन यांनी अमेरिकेसह इतर देशांनी लादलेल्या निर्बंधांना लक्ष्य करताना अमेरिकी डॉलरसह इतर पाश्चिमात्य चलनांचे वर्चस्व लवकरच संपुष्टात येईल, असेही बजावले. यावेळी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अण्वस्त्रांच्या मुद्यावर अमेरिकेशी केलेल्या ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’तून रशिया काही काळासाठी बाहेर पडत असल्याची घोषणाही केली.

येत्या शुक्रवारी २४ फेब्रुवारीला रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात विविध मुद्यांवरील आपली भूमिका मांडली. अमेरिका व नाटोने डिसेंबर २०२१मध्ये रशियाचा सुरक्षा हमीचा प्रस्ताव नाकारला होता. याच काळात युक्रेनला समर्थन देणाऱ्या देशांनी युक्रेनला डोन्बासमध्ये मोठे युद्ध छेडण्यासाठी परवानगी दिली. डोन्बासनंतर त्यांचे लक्ष्य क्रिमिआ ताब्यात घेणे हे होते. ही माहिती मिळाल्याने रशियाच्या सुरक्षेसाठी युद्धाचा निर्णय घेणे भाग पडले, याची जाणीव पुतिन यांनी करून दिली. युद्ध त्यांनी सुरू केले होते व रशिया लष्करी सामर्थ्याच्या बळावर त्याची अखेर करील, असा दावाही त्यांनी केला.

Russian-parliament-2पाश्चिमात्य आघाडीला रशियाविरोधात संघर्ष हवा असून तो कोण करते आहे, याच्याशी त्यांना घेणदेणे नाही असा आरोपही पुतिन यांनी केला. युक्रेनी जवान नाझी राजवटीशी निगडीत चिन्हे व इतर घटक वापरत आहेत, याचा आता पाश्चिमात्य देशांना विसर पडल्याकडेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. ‘रशियाविरोधी संघर्षासाठी कोणाचा वापर करायचा यासाठी पाश्चिमात्यांनी कोणताही पर्याय बाजूला ठेवलेला नाही. ते कोणाचाही वापर करु शकतात. मग त्यात दहशतवादी, नवनाझी अगदी सैतानालाही सामील करुन घेतील. फक्त आमच्यासाठी लढा इतकीच अट त्यासाठी ठेवलेली आहे’, अशी टीकाही रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केली.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य आघाडीने लादलेले निर्बंध व रशियन अर्थव्यवस्थेबाबतही पुतिन यांनी वक्तव्य केले. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा रशियन अर्थव्यवस्थेवर विशेष परिणाम झालेला नसून रशियन अर्थव्यवस्था सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. उलट या निर्बंधांमुळे जागतिक व्यवस्थेत सध्या वर्चस्व असणाऱ्या आघाडीच्या चलनांचा प्रभाव पुढील काळात नाहीसा झालेला असेल, याकडे पुतिन यांनी लक्ष वेधले. अमेरिकी डॉलर व युरोचा वापर नसलेली सुरक्षित व्यवस्था उभारण्यासाठी रशिया आपल्या सहकारी देशांबरोबर प्रयत्न करीत आहे, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितले.

संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात रशियन राष्ट्राध्यक्षांनी ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’तून तात्पुरती माघार घेत असल्याची घोषणाही केली. रशिया व अमेरिकेमधील अण्वस्त्रांसंदर्भातील अखेरचा करार म्हणून ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ ओळखण्यात येते. त्याला मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आता पुतिन यांनी त्यातून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने सदर कराराचे भवितव्य अनिश्चित झाल्याचे दिसत आहे.

leave a reply