अफगाणिस्तान पुन्हा दहशतवादाचे केंद्र बनत आहे

- ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा ’एमआय५’च्या प्रमुखांचा इशारा

लंडन – तालिबानच्या नियंत्रणाखाली गेलेले अफगाणिस्तान पुन्हा दहशतवादाचे केंद्र बनत चालले आहे. सहा महिन्यांपूर्वीच्या पाश्चिमात्य देशांच्या माघारीनंतर दहशतवादी नव्याने अफगाणिस्तानात आपले नेटवर्क उभारीत आहेत. ब्रिटनसह जगभरातील दहशतवादी आणि कट्टरपंथीय अफगाणिस्तानात दाखल होत असून ब्रिटनच्या सुरक्षेसाठी हा गंभीर धोका ठरतो, असा इशारा ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा एमआय५चे प्रमुख केन मॅकलम यांनी दिला.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेऊन नुकतेच सहा महिने पूर्ण झाले. या काळात अफगाणिस्तानातील अल कायदा आणि आयएसचे नेटवर्क मजबूत होत असल्याचा आरोप अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी केला होता. काही आठवड्यांपूर्वीच अमेरिकेने अफगाणिस्तानातील आयएसच्या कमांडरच्या शीरावर रोख इनाम जाहीर केले. तर संयुक्त राष्ट्रसंघाने देखील अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली होती. यानंतरच्या काही दिवसातच एमआय५च्या प्रमुखांचा हा इशारा प्रसिद्ध झाला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच केन मॅकलम यांनी अफगाणिस्तान पुन्हा दहशतवादाचे केंद्र बनू शकते याकडे लक्ष वेधले होते. तालिबान सत्तेवर आल्यामुळे दहशतवादी आणि कट्टरपंथीयांचा उत्साह व उन्माद वाढल्याचा दावा मॅकलम यांनी केला होता. तर काही तासांपूर्वी ब्रिटिश दैनिक डेली मेलशी बोलताना देखील मॅकलम यांनी हा इशारा दिला. पाश्चिमात्य देशांना पराभूत करून तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याचा समज झालेले ब्रिटनमधील कट्टरपंथीय अफगाणिस्तानात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती मॅकलम यांनी दिली. या कट्टरपंथियांना हाताशी धरून अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना अधिक मजबूत होतील आणि ब्रिटनवर हल्ल्याचा कट आखतील, असा दावा मॅकलम यांनी केला.

काही वर्षांपूर्वी सीरियामध्ये आयएसने पुकारलेल्या संघर्षात ब्रिटनमधील शेकडो कट्टरपंथीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते. त्यांच्यापासून ब्रिटनच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतरही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याचे मॅकलम म्हणाले. अफगाणिस्तानात गोळा होत असलेले हे दहशतवादी अल कायदाप्रमाणे मोठे हल्ले चढवू शकतात, असा इशारा मॅकलम यांनी दिला. यासाठी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी २००६ सालच्या हिथ्रो विमानतळावरील हल्ल्याचा दाखला दिला.

कोरोनामुळे जगभरात झालेली जीवितहानी देखील अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना जैविक हल्ल्यांसाठी उद्युक्त करू शकते, असा दावा मॅकलम यांनी केला. काही महिन्यांपूर्वी आयएसच्या दहशतवाद्यांनी असे जैविक हल्ले चढविण्याचे इशारे दिले होते. या पार्श्वभूमीवर, ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिलेल्या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, आपल्या भूमीचा वापर इतर कुठल्याही देशावर दहशतवादी हल्ल्यासाठी होणार नाही, अशी घोषणा तालिबानने सत्तेवर येताच केली होती. पण तालिबान या आश्‍वासनाची पुर्तता करील, याची कुणालाही शाश्‍वती उरलेली नाही. तालिबानमधले गट-तट लक्षात घेता तालिबानच्या नेत्यांचे आपल्या संघटनेवरही पूर्णपणे नियंत्रण उरलेले नाही. अशा परिस्थितीत पाश्‍चिमात्यांवरील दहशतवादी हल्ले रोखण्याची क्षमता तसेच इच्छाशक्ती देखील तालिबानकडे नसल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply