रशियाने युक्रेनवर आक्रमण केले नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार

पॅरिस/वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाने युक्रेनवर आक्रमण केले नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतील, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रविवारी दोन्ही नेत्यांशी केलेल्या चर्चेनंतर यासंदर्भात घोषणा करण्यात आली. पुतिन-बायडेन भेटीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री येत्या काही दिवसात परस्परांची भेट घेतील, असेही सांगण्यात आले आहे.

रशिया व युक्रेन सीमेवरील तणाव सध्या चांगलाच चिघळला असून अमेरिकी नेतृत्त्वाकडून सातत्याने हल्ल्याबाबत गंभीर इशारे देण्यात येत आहेत. रशियाने युक्रेन सीमेवरील तैनाती कमी करण्याऐवजी त्यात अधिक भर टाकण्यास सुरुवात केल्याचे दावेही करण्यात येत आहेत. युक्रेन सीमेवरील रशियाची तैनाती जवळपास दोन लाखांनजिक पोहोचल्याचेही या दाव्यांमध्ये सांगण्यात आले. या दाव्यांना पुष्टी देणारे सॅटेलाईट फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. युक्रेनवरील आक्रमणाबाबत पाश्‍चात्यांकडून करण्यात येणारी वक्तव्ये चिथावणीखोर असल्याचे आरोप रशिया करीत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, राजनैतिक हालचालीहींनाही वेग आला आहे. गेल्याच आठवड्यात फ्रान्स तसेच जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांनी रशियाला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. ब्रिटनच्या संरक्षण व परराष्ट्रमंत्र्यांनीही रशियाचा दौरा केला होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. रविवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे उघड झाले आहे. पुतिन यांच्याबरोबरच मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा केली.

पुतिन व बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी युक्रेन मुद्यावर भेट घेण्याचे मान्य केल्याचे फ्रान्सकडून सांगण्यात आले. फ्रान्सकडून करण्यात आलेल्या घोषणेला अमेरिका व रशिया या दोन्ही देशांनी दुजोरा दिला आहे. अमेरिकेने बायडेन यांच्या भेटीपूर्वी युक्रेनसंदर्भात अट घातल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. रशियाने युक्रेनवर हल्ला केला नाही तर बायडेन रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील, असे अमेरिकेने म्हटले आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन सीमेवरील पूर्व युक्रेनमध्ये गोळीबार व तोफांचा मारा सुरू असल्याचे दावे समोर आले आहेत. युक्रेनच्या लष्कराकडून हे हल्ले सुरू असल्याचे सांगण्यात येत असून पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक बंडखोरांनी रशियाकडे सहाय्याची मागणी केली आहे. त्याचवेळी युक्रेनच्या एका तुकडीने रशियाच्या रोस्टोव्ह भागात हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. या हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरात युक्रेनचे पाच जवान मारले गेल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र युक्रेनने ही बाब फेटाळली असून सदर माहिती ‘फेक न्यूज’ असल्याचे स्पष्टीकरणे दिले आहे.

leave a reply