अफगाणिस्तानचे प्रमुख नेते डॉ. अब्दुल्ला भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली – अफगाणी सरकारमधील प्रमुख नेते डॉ. अब्दुला अब्दुल्ला भारतात आले असून त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात अफगाणिस्तानचे लष्करप्रमुख भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. अफगाणिस्तानचे लष्कर आणि तालिबानमध्ये जबरदस्त संघर्ष सुरू असताना, अफगाणी नेते व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भारतभेटीला फार मोठे धोरणात्मक तसेच सामरिक महत्त्व आले आहे. तालिबानच्या विरोधात भारताने अफगाणिस्तानला लष्करी सहाय्य पुरवावे, अशी मागणी या देशाकडून केली जात आहे. भारत त्याला प्रतिसाद देण्याची तयारी करीत असून याचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटत असल्याचे दिसते.

अफगाणिस्तानचे प्रमुख नेते डॉ. अब्दुल्ला भारताच्या भेटीवरपरराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याबरोबर झालेल्या भेटीची माहिती सोशल मीडियावर दिली. मात्र याचे तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. डॉ. अब्दुल्ला खाजगी भेटीवर असल्याचे सांगितले जाते. पण तालिबानबरोबर अफगाणी लष्कराचा जबरदस्त संघर्ष सुरू असताना, अफगाणिस्तानच्या सरकारमधील क्रमांक दोनचे नेते मानले जाणार्‍या डॉ. अब्दुल्ला यांची ही सर्वसाधारण खाजगी भेट असणे शक्य नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानचे सरकार व लष्करासह या देशातील तालिबानविरोधी समुह व गट एकजूट करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. या सर्वांना एकत्र करून तालिबानचा पाडाव करण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांचे सरकार करीत आहे. यासाठी भारत फार मोठे सहाय्य करू शकेल, असा विश्‍वास अफगाणिस्तानच्या सरकारला वाटत आहे.

कुठल्याही परिस्थितीत अफगाणी जनतेच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही भारताने दिलेली आहे. तालिबानच्या विरोधात अफगाणी लष्कराला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य तसेच लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरविण्याची मागणी अफगाणिस्तानच्या सरकारकडून केली जात आहे. यातील काही गोष्टी भारताने आधीच अफगाणिस्तानला पुरविल्याच्या बातम्या आल्या होत्या. तरीही भारत अफगाणिस्तानातील परिस्थितीकडे अत्यंत सावधपणे पाहत आहे. पाकिस्तानच्या इशार्‍याने काम करणार्‍या तालिबानपासून भारताला फार मोठा धोका संभवतो, असा दावा अफगाणी सरकार करीत आहे. यामुळे भारताने आपल्या हालचाली अधिक तीव्र केल्याचे दावे माध्यमांकडून केले जातात.

leave a reply