अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानची आगेकूच थोपवावी

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

तालिबानची आगेकूचवॉशिंग्टन – तालिबानच्या दहशतवाद्यांनी एखाद्या भूभागाचा ताबा घेण्याआधीच अफगाणी लष्कराने तालिबानची आगेकूच थोपविण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला. तालिबान प्रमुख शहरांना वेढा घालत असल्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी बजावले. अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी हा सल्ला दिला आहे.

अफगाणिस्तानच्या लष्करात तालिबानला थोपविण्याची आणि दहशतवादी संघटनेला मागे ढकलण्याची क्षमता आहे. पण अफगाणी लष्कर तालिबानला किती काळ रोखू शकेल, ते सांगता येणार नाही’, असे संरक्षणमंत्री ऑस्टिन म्हणाले. पण प्रांतांच्या राजधान्या तालिबानच्या ताब्यात गेल्या तर अफगाणिस्तानची व्यवस्था कोलमडेल, असा इशारा ऑस्टिन यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली यांनी तालिबान काबुलसह इतर प्रांतांच्या राजधान्यांचा ताबा घेण्याच्या तयारीत असल्याचे बजावले होते. संरक्षणमंत्री ऑस्टिन देखील तालिबानपासून काबुलला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे.

राजधानी काबुल तसेच अफगाणी प्रांतांच्या राजधान्या तालिबानच्या हाती जाऊ देणार नसल्याचे अमेरिकेने याआधी स्पष्ट केले होते. यासाठी तालिबानवर हल्ले चढविण्याचा इशारा अमेरिकेने महिन्याभरापूर्वी दिला होता. गेल्या आठवड्यात कंदहार आणि हेल्मंड प्रांतात तालिबानवर घणाघाती हवाई हल्ले चढवून अमेरिकेने आपला इशारा प्रत्यक्षात उतरविला होता.

leave a reply