अफगाणिस्तान आणि नेपाळने पाकिस्तानचा आदर्श घ्यावा – चीनची अपेक्षा

नवी दिल्ली – नेपाळ आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आदर्श घ्यावा आणि चीनसोबत सहकार्य दृढ करावे असा सल्ला चीनच्या परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी या राष्ट्रांना दिला. चीन, नेपाळ, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मंगळवारी एक व्हर्च्युअल बैठक झाली. ही बैठक कोरोनाच्या साथीशी लढण्याकरिता सहकार्य वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत चीनकडून बेल्ट अँड रोड (बीआरआय) प्रकल्पासाठी नेपाळ आणि अफगाणिस्तानकडून सहकार्याची अपेक्षा करण्यात आली. यावरून चीनची अस्वस्थता लक्षात येते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानचा आदर्श

कोरोनाव्हायरसच्या साथीनंतर जगभरात चीनविरोधात संताप आहे. कित्येक राष्ट्र चीनबरोबरील आपले सहकार्य कमी करीत आहेत. गलवानमधील संघर्षानंतर भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली असून जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे. अशा परिस्थितीत चीन भारताशेजारील देशांना साधण्यांचा प्रयत्न करीत आहे. अफगाणिस्तान पर्यंत ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’चा विस्तार केला, तर अफगाणिस्तानला त्याचा लाभ मिळेल हे सांगून चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी अफगाणिस्तानचे सहकार्य मागितले. नेपाळ आणि अफगाणिस्तानला याबाबतीत आपला पक्का मित्र असलेल्या पाकिस्तानचा आदर्श घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

अफगाणिस्तानचे कार्यवाहू परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार आणि नेपालचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गवली या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांच्या जागी पाकिस्तानचे अर्थमंत्री मखदूम खुसरो बख्तियार यांनी या बैठकीत भाग घेतला. यावेळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यात आला.

चीनकडून नेपाळ आणि अफगाणिस्तानबरोबर सहकार्य वाढीसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न भारताविरोधात शेजारी राष्ट्रांची आघाडी तयार करण्याचा भाग ठरतो, हे स्पष्ट दिसते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेलेल्या ‘ बीआरआय’ सध्या अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या साथीमुळे चीनने गुंतवणूक केलेल्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असून अशा स्थितीत चीनला यातून लाभ मिळेल अशी शक्यता धूसर झाली आहे, असे अहवाल आहेत.

तसेच सध्याची भूराजकीय समीकरणे चीनच्या विरोधात असून दक्षिण आशियात भारताच्या शेजारी राष्ट्रांना आपलेसे करून आघाडी उघडण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
मात्र नेपाळच्या चीनधार्जिण्या के.पी. ओली सरकारने सातत्याने भारताविरोधात भूमिका घेतली असली, तरी त्यांना आपल्याच देशात विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यांचे सरकार कोसळू शकते अशी स्थिती आहे. नेपाळाकडून भारतविरोधी वादग्रस्त निर्णयानंतरही सातत्याने भारताशी चर्चेसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. तसेच नेपाळसाठी चीन हा भारताचा पर्याय ठरू शकत नाही, असे त्यांच्याच देशातील विश्लेषक सांगत आहेत.

अफगाणिस्तान सरकार पाकिस्तानचा आपल्या देशातील हस्तक्षेप आणि दहशतवादी कारवायांना विरोध करीत असून अशा परिस्थिती त्यांना पाकिस्तानचा आदर्श घेण्यास सांगणे हस्यास्पद ठरते, असेही काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच ‘सीपीईसी’ प्रकल्पाला पाकिस्तानातच विरोध असून भारताने ‘पीओके’ ताब्यात घेतल्यास या प्रक्लपाचे काय होईल, अशी धास्तीही चीनला आहे. दरम्यान, भारत सध्या चीनच्या या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

leave a reply