अफगाणिस्तानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघात खेचले

न्यूयॉर्क/इस्लामाबाद – दहा दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या सीमाभागात हवाई हल्ले चढवणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात अफगाणिस्तानातील सारे गट एकत्र आले आहेत. पाकिस्तानचे हल्ले आंतरराष्ट्रीय नियमांचे धडधडीत उल्लंघन ठरते, असा ठपका संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानच्या ‘चार्ज दि अफेअर्स’ यांनी ठेवला. तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि तेहरीक-ए-तालिबान या गटांनी पाकिस्तान विरोधी तक्रारीला आपले समर्थन दिले. दरम्यान, अफगाणिस्तानातील ही एकी पाकिस्तानसाठी आव्हान ठरू शकते. येत्या काळात ड्युरंड लाईनच्या प्रश्नावरून तालिबान आणि पाकिस्तानी लष्करात मोठा संघर्ष भडकू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत.

16 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या हवाईदलाने अफगाणिस्तानच्या कुनार आणि खोस्त येथे जोरदार हल्ले चढविले होते. अफगाणिस्तानच्या सीमाभागात घडलेल्या तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना आपण लक्ष केल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला होता. पण या कारवाईमध्ये 47 निरपराध अफगाणींचा बळी गेल्याचा आरोप तालिबानने केला होता. तसेच यापुढे पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी धमकी तालिबानच्या वरिष्ठ नेत्याने दिली होती. तसेच पाकिस्तानने गंभीर परिणामांसाठी तयार रहावे, असे तालिबानने बजावले होते.

या इशाऱ्याला काही तास उलटत नाही तोच या प्रकरणी अफगाणिस्तानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये खेचले. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या कारकिर्दीत संयुक्त राष्ट्रसंघातील चार्ज दी अफेअर्स म्हणून नियुक्त झालेले नासिर अहमद बाईक या राजनैतिक अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान विरोधात तक्रार केली. ‘पाकिस्तानने अफगाणिस्तानात चढवलेले हवाई हल्ले आंतरराष्ट्रीय नियम आणि मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन करणारे ठरतात. संयुक्त राष्ट्रसंघ आणि सुरक्षा परिषदेच्या नियमांची ही पायमल्ली ठरते’, असा ठपका फैक यांनी ठेवला.

‘गेले दशकभर पाकिस्तानचे लष्कर अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये हल्ले करीत आहे. तसेच या भागात पाकिस्तानी लष्कराकडून चौक्या व काटेरी कुंपण उभारले जात आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने चढवलेले हवाई हल्ले आणि यामध्ये अफगाणींचा गेलेला बळी अतिशय गंभीर बाब ठरते. पाकिस्तानचे हल्ले अतिशय निंदनीय असून ते ताबडतोब थांबलेच पाहिजेत’, अशी मागणी अफगाणिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी केली. याआधी फेब्रुवारी 2019, ऑगस्ट 2019 आणि जुलै 2020 मध्येही अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात तक्रार केली होती. पण यावेळी मात्र अफगाणिस्तानातील वेगवेगळे गट पाकिस्तान विरोधात एकवटल्याचे दिसत आहे.

तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि तेहरीक-ए-तालिबान असे तालिबानमधले वेगवेगळे गट पाकिस्तान विरोधात एकत्र आले आहेत. नासिर अहमद फैक यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या तक्रारीला तालिबानच्या गटांनी समर्थन दिले. तसेच शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी खेचलेली आणि पश्तून नागरिकांना विभागणारी ड्युरंड लाईन आपल्याला मान्य नसल्याचे तालिबानच्या या सर्व गटांनी एकमुखाने जाहीर केले आहे. ही बाब पाकिस्तानच्या चिंतेत भर घालणारी ठरू शकते.

पाकिस्तानने आत्तापर्यंत अफगाणिस्तानातील काही गटांना हाताशी धरून हा देश अस्थीर करण्याचे सत्र सुरू ठेवले होते. त्याचवेळी अफगाणिस्तानातील काही गट पाकिस्तानच्या पूर्णपणे विरोधात गेले होते. पण आता ड्युरंड लाईनच्या मुद्यावर अफगाणिस्तानातील गटतट एकत्र आल्यामुळे पाकिस्तानने आत्तापर्यंत वापरलेले डावपेच या देशावर उलटू शकतात. ड्युरंड लाईनवरील तणाव त्याचे संकेत देत आहे.

leave a reply