रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्याच्या टंचाईमुळे आखातात दंगली भडकतील

- आंतरराष्ट्रीय संघटनांचा इशारा

वॉशिंग्टन – रशिया आणि युक्रेन यांच्यात भडकलेल्या युद्धाचे दूरगामी परिणाम आखाती, आफ्रिकी देशांवर होतील. रशिया-युक्रेनमधून येणाऱ्या धान्यावर अवलंबून असलेले इजिप्त, लेबेनॉन, सिरिया, ट्युनिशिया या देशांमध्ये येत्या काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन अन्नासाठी दंगली भडकतील. तसेच महागाई प्रचंड प्रमाणात वाढून आखाती व उत्तर आफ्रिकी देशांमधील नागरिक मोठ्या संख्येने युरोपिय देशांमध्ये स्थलांतरित होतील, असा इशारा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना व विश्लेषक देत आहेत.

दंगलीरशिया-युक्रेनमधील युद्धाचे परिणाम इजिप्तमध्ये दिसू लागले आहेत. एकटा इजिप्त रशिया व युक्रेनकडून आपल्या मागणीच्या 80 टक्के गहू आयात करतो. पण रशियाने युक्रेनवर हल्ले चढविल्यानंतर इजिप्तची कोंडी झाली असून अरब देश इजिप्तच्या मदतीसाठी धाव घेत आहेत. तसेच इजिप्तने भारताकडे गव्हाच्या आयातीची मागणी केली आहे.

तर याआधीपासून आर्थिक संकटात सापडलेल्या लेबेनॉन आणि ट्युनिशिया या देशांमधील महागाई रशिया-युक्रेन युद्धानंतर गगनाला भिडल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. लेबेनॉन रशिया-युक्रेनकडून 60 टक्के गव्हाची आयात करतो. तर ट्युनिशिया 80 टक्के कडधान्याची आयात करीत होता. आधीच आर्थिक कर्जात बुडालेल्या लेबेनॉन व ट्युनिशियामधील महागाई रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे भयावह स्तरावर पोहोचल्याची चिंता व्यक्त केली जाते.

अशीच परिस्थिती कायम राहिली तर लेबेनॉनला दुष्काळाचा सामना करावा लागेल आणि या देशात अन्नासाठी नव्याने दंगली भडकतील, असा इशारा आर्थिक विश्लेषक देत आहेत. तर रशिया-युक्रेनकडून येणाऱ्या गहू आणि कडधान्यावर अवलंबून असलेल्या उत्तर आफ्रिकी देशांमधील नागरिक पुन्हा एकदा युरोपसाठी स्थलांतरीत होतील, असेही आंतरराष्ट्रीय विश्लेषक बजावत आहेत.

leave a reply