ड्रोन्सनंतर इराण रशियाला क्षेपणास्त्रे पुरविण्याच्या तयारीत

पाश्चिमात्य देशांचा आरोप

वॉशिंग्टन – इराण युक्रेनमधील युद्धात रशियाला लष्करी सहाय्य करीत आहे. कामिकाझी ड्रोन्सनंतर इराण रशियाला जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी लघू पल्ल्यांची क्षेपणास्त्रे पुरविण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला. या सहकार्याद्वारे युक्रेन युद्धात रशियाप्रमाणे इराण देखील युद्धगुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट होईल, असा आरोप पाश्चिमात्य देश करीत आहेत. याआधीच युक्रेनमधील युद्धासाठी इराणने रशियाला ड्रोन्स पुरविल्याचा तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे जवान क्रिमिआमध्ये तैनात असल्याचे आरोप पाश्चिमात्य देशांनी केले होते.

iran_russia_missilesगेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्रेनबरोबरच्या युद्धात रशियाला जबर हानी सोसावी लागल्याचा दावा पाश्चिमात्य देश व माध्यमे करीत आहेत. क्रिमिआप्रमाणे रशियाने युक्रेनच्या अन्य तीन प्रांताचे विलिनीकरण केल्यानंतरही पाश्चिमात्य माध्यमे या युद्धात रशियाची पिछेहाट झाल्याचा दावा करीत आहेत. या युद्धात रशियन लष्कराची जबर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. रशियन लष्कराचा क्षेपणास्त्र साठा बऱ्याचप्रमाणात खर्च झाल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता. त्यामुळे युक्रेनमधील युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशिया इराणकडून लष्करी सहाय्य घेत असल्याचे पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, इराण रशियाला लवकरच किमान १००० शस्त्रास्त्रे पुरविणार आहे. यामध्ये ड्रोन्सबरोबरच लघू पल्ल्याच्या शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा देखील समावेश असल्याचे अमेरिका व युरोपिय देशाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यामुळे युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांना असलेला धोका वाढेल, असा दावा पाश्चिमात्य अधिकारी करीत आहेत.

दरम्यान, युक्रेनमध्ये खरे युद्ध सुरूच झाले नसल्याचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही महिन्यांपूर्वीच दिला होता. या युद्धात रशियाने आपले लष्करी सामर्थ्य वापरले नसल्याचे संकेत रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिले होते.

leave a reply