पाश्चिमात्यांच्या निर्बंधांनंतरही रशियाच्या नैसर्गिक इंधनवायू निर्यातीत विक्रमी वाढ

russia lng exportsमॉस्को/लंडन – रशिया-युक्रेन युद्धात रशियन राजवटीला धडा शिकविण्यासाठी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. रशियन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या इंधनक्षेत्राला खिळखिळे करण्याचे प्रयत्नही सुरू असून इंधनाच्या दरांवर मर्यादा लादण्याचा प्रस्ताव मंजूर करयण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही रशियाचे इंधनक्षेत्रातील वर्चस्व मोडण्यात पाश्चिमात्य आघाडी अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १० महिन्यात रशियाकडून होणारी इंधनवायूची निर्यात विक्रमी स्तराकडे वाटचाल करीत असल्याचे उघड झाले. जानेवारी ते सप्टेंबर या काळातील उच्चांकी निर्यातीनंतर ऑक्टोबर महिन्यातही रशियाच्या इंधनवायू निर्यातीत एक टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची माहिती ‘ब्लूमबर्ग’ने दिली आहे.

pipework-at-a-gasरशियाने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी २.७८ दशलक्ष टन इतक्या इंधनवायूची निर्यात केली होती. ऑक्टोबर महिन्यात त्यात १.१ टक्क्यांहून अधिक भर पडल्याचे इंधनवायूची निर्यात करणाऱ्या जहाजांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. २०२१ साली हेच प्रमाण २.६२ दशलक्ष टन होते. त्यात सातत्याने पडणारी भर पाहता २०२२ सालच्या अखेरपर्यंत रशिया इंधनवायूच्या निर्यातीचा नवा उच्चांक गाठेल, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.

रशियाचा इंधनवायू आयात करणाऱ्या देशांमध्ये सर्वाधिक वाटा आघाडीचे युरोपिय देश तसेच चीन व जपानचा आहे. युरोपातील स्पेन, फ्रान्स, बेल्जियम या देशांनी रशियाकडून सर्वाधिक इंधनवायू आयात केल्याचे समोर आले आहे. स्पेन व बेल्जियम या देशांनी यापूर्वीच्या रशियन आयातीचा विक्रम मोडला असून फ्रान्सने गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के अधिक रशियन इंधनवायू आयात केला आहे. जपानने रशियन इंधनवायूची आयात वाढवितानाच आपल्या आघाडीच्या कंपन्यांना रशियन इंधनक्षेत्रातून बाहेर पडू नये, असे निर्देश दिल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, युरोपने २०२२ नाही तर २०२३ सालच्या इंधनसाठ्यांबाबत विचार करावा, अन्यथा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा ‘इंटरनॅशनल एनजी एजन्सी’ तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.

leave a reply