चीनपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर

- तैवानचा जबरदस्त युद्धसराव

युद्धसरावजिआदॉंग – तैवानच्या संरक्षणदलांनी मोठा युद्धसराव आयोजित केला आहे. लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणेने सज्ज टेहळणी विमानांचे महामार्गावर लँडिंग करून तसेच रणगाडे आणि तोफांच्या लाईव्ह फायरिंगद्वारे तैवाने या सरावाची सुरुवात केली. हा अँटी-इन्व्हॅशन अर्थात आक्रमणविरोधी सराव असल्याचे तैवानने जाहीर केले. त्याचबरोबर देशाचा संरक्षणखर्च तब्बल नऊ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचा निर्णय तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई यांच्या सरकारने घेतला. कुठल्याही क्षणी चीन तैवानचा ताबा घेईल, अशा धमक्या चीनकडून दिल्या जात असताना, तैवानने आपल्या सज्जतेचे प्रदर्शन याद्वारे केल्याचे दिसत आहे.

येत्या काळात युद्ध पेटून शत्रूने तैवानचे हवाईतळ, धावपट्टी नष्ट केली तर महामार्गांचा वापर करता यावा. तसेच कमीतकमी वेळेत शत्रूच्या हल्ल्यांना उत्तर देता यावे, यासाठी तैवानने चार दिवसांचा सराव आयोजित केला आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या हॅन कुआंग सरावात तैवानच्या हवाईदलातील एफ-१६व्ही, मिराज २०००, तसेच स्वदेशी बनावटीचे चिंग-कुओ लढाऊ विमाने आणि अवॅकने सज्ज असलेली ई-२के विमाने सहभागी झाली. राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांच्या उपस्थितीत हा सराव सुरू झाला. यासाठी तैवानमध्ये पाच इमर्जन्सी महामार्ग धावपट्टी उभारण्यात आल्या आहेत.

युद्धसरावतैवानच्या वेगवेगळ्या भागात हा सराव सुरू असतानाच राष्ट्राध्यक्षा त्साई यांच्या सरकारने देशाच्या संरक्षणखर्चात कोट्यवधी डॉलर्सची वाढ करण्याची घोषणा केली. तैवानचा संरक्षणखर्च ८.६९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून हवाईतळांची सुरक्षा व नव्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी यातील एक अब्ज डॉलर्स खर्च होतील. याशिवाय तैवान नव्या युद्धनौकांची खरेदी तसेच हवाई सुरक्षा यंत्रणेचे अद्ययावतीकरण देखील करणार आहे.

दरम्यान, २०२५ सालापर्यंत लष्करी सामर्थ्याच्या बळावर चीन तैवानचा ताबा घेईल, असा दावा चीनमधील लष्करी विश्‍लेषक करीत आहेत. दशकभरापूर्वीच चीनने याची योजना आखली होती. गेल्या काही महिन्यांपासून चीनचे लष्करी अधिकारी देखील तसे इशारे देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, तैवानच्या युद्धसज्जतेचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply