‘पिनाका रॉकेट लॉन्चर्स’च्या खरेदीसाठी २५८० कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली – चीनबरोबरील वाढत्या तणावाचा पार्श्वभूमीवर लष्करी सामर्थ्यात वाढ करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याअंतर्गत संरक्षण मंत्रालयातर्फे ११४ ‘पिनाका रॉकेट लॉन्चर्स’च्या (सहा पिनाका रेजिमेंट्स) खरेदीसाठी भारतीय कंपन्याबरोबर २५८० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी सरकारकडून या क्षेत्रातील खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून हा करार त्याचाच भाग मानला जातो.

'पिनाका रॉकेट लॉन्चर्स'

गेल्या काही दिवसात भारत व चीनमधील तणाव जबरदस्त चिघळला आहे. भारताने चीनच्या कारवायांना लष्करी पातळीवर प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी केली असून त्यासाठी संरक्षणदले व यंत्रणांची तैनाती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सध्या लडाखबरोबर चीनला लागून असलेल्या नियंत्रणरेषेवर रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि इतर संरक्षणयंत्रणा तैनात आहे. ‘सहा पिनाका रेजिमेंट्स’च्या खरेदीचा निर्णय याच धोरणातील पुढचा टप्पा ठरतो.

‘पिनाका’ हे ‘डीआरडीओ’ने विकसित केलेले स्वदेशी बनावटीचे मल्टी बॅरेल क्षेपणास्त्र आहे. ‘पिनाका मार्क १’ची मारक क्षमता ४० किलोमीटर, तर ‘पिनाका मार्क२’ची मारक क्षमता ७५ किलोमीटरपर्यंत आहे. डोंगराळ प्रदेशात दडून बसलेल्या शत्रूंना लक्ष्य करण्याची क्षमता ‘पिनाका’मध्ये आहे. भारतीय लष्करात यापूर्वीच ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांची तैनाती करण्यात आली आहे. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात यांचा प्रभावीरित्या वापर करण्यात आला होता. हे लष्करातील परिणामकारक व सामर्थ्यशाली क्षेपणास्त्र मानले जाते.

पिनाका रेजिमेंटच्या पुरवठ्यासाठी ‘भारत अर्थ मूवर्स लि.’ (बीईएमएल), टाटा पॉवर कंपनी लि. (टीपीसीएल) आणि ‘एल अँड टी’ बरोबर करार करण्यात आला आहे. या सहा पिनाका रेजिमेंट्समध्ये, ऑटोमेटेड गन एमिन्ग अँड पोझिशनिंग सिस्टम (एजीएपीएस) सह ११४ लाँचर आणि ४५ कमांड पोस्ट्स ‘टीपीसीएल’ व ‘एल अँड टी’ कडून पुरवल्या जातील. ‘बीईएमएल’कडून रॉकेट्स वाहून नेण्यासाठी ३३० वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.संरक्षण मंत्रालयाकडून खरेदी करण्यात येणारे हे लॉन्चर्स देशाच्या दोन्ही सीमांवर तैनात करण्यात येणार आहेत. भारत चीन सीमेवर तणाव वाढत असतानाच पाकिस्तान सीमेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची जाणीव ठेऊन पिनाकाच्या खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. २०२४ सालापर्यंत याची तैनाती पूर्ण होईल, असे संकेत संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिले आहेत.

‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी स्वदेशी कंपन्यांकडून लॉँचर्सची खरेदी करण्यात येणार आहे. या कंपन्याबरोबर करण्यात आलेल्या करारांतर्गत ७० टक्के स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे. लॉन्चर्सच्या खरेदीसाठी स्वदेशी कंपन्यांबरोबर करारकरून देशातंर्गत संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना बळकटी देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी, संरक्षणक्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ बरोबरच ‘मेक फॉर वर्ल्ड’चे उद्दिष्ट असल्याचे सांगून संरक्षणक्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलण्यात येत असल्याची माहिती दिली होती.

leave a reply