सिरियन कुर्द नेत्यांच्या रशिया भेटीवर तुर्कीचा संताप

अंकारा – रशिया आणि तुर्कीमध्ये मतभेद वाढू लागल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. रशियाने सिरियातील कुर्द नेत्यांना आमंत्रित करुन त्यांच्याबरोबर केलेल्या सहकार्यावर तुर्कीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. रशियाने तुर्कीबरोबरच्या सहकार्य कराराचे पालन करावे, अशी नाराजी तुर्कीने व्यक्त केली. तर रशियाने सिरियन कुर्दांबरोबरच्या सहकार्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, याआधीपासूनच सिरिया आणि लिबियातील संघर्षात रशिया आणि तुर्की परस्परविरोधी गटांचे समर्थन करीत आले आहेत.

तुर्कीचा संताप

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी सोमवारी ‘सिरियन डेमोक्रॅटीक कौंसिल’ (वायपीजी) या सिरियन कुर्द संघटनेच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत रशिया समर्थक सिरियन गट ‘पॉप्युलर विल पार्टी’च्य (पीडब्ल्यूपी) नेत्यांचाही समावेश होता. सिरियाच्या भविष्यातील सरकारमध्ये कुर्दांना स्थान मिळावे, या मुद्यावर ही बैठक पार पडल्याचे रशियाने जाहीर केले. यावेळी रशियन परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी सिरियामध्ये सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असलेले सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी सिरियन कुर्द नेत्यांबरोबर सामंजस्य करार केल्याची माहितीही समोर येत आहे.

सोमवारी तुर्कीचे उपपरराष्ट्रमंत्री सेदात ओनल आपल्या शिष्टमंडळासह रशियन परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार होते. पण त्याआधीच रशियाने कुर्दांची भेट घेऊन सहकार्य केल्यामुळे राजनैतिक स्तरावर तुर्कीला हादरा दिल्याचे म्हटले जाते. यामुळे संतापलेल्या तुर्कीने रशियाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तुर्कीबरोबर झालेल्या सहकार्य कराराचे रशियाने पालन करावे, असे सांगून तुर्कीने रशियाला अस्ताना कराराची आठवण करुन दिली. तुर्कीने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या कुर्द संघटनेच्या नेत्यांची रशियाने भेट घेतल्याची टीका तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

रशियाने सिरियन कुर्दांबरोबर प्रस्थापित केलेले सहकार्य नवे नसून वर्षभरापूर्वी रशियाने सिरियन कुर्दांबरोबर लष्करी सहकार्य करार केला होता. सिरियातील ‘आयएस’ व संलग्न दहशतवादी संघटनांविरोधात संघर्ष करण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीने सिरियातील अस्साद राजवट आणि कुर्दांमध्ये वाटाघाटी झाल्या होत्या. रशिया आणि सिरियन कुर्दांमधील या सहकार्यावर त्यावेळी तुर्कीने आक्षेप घेतला होता. तुर्कीत हल्ले चढविणार्‍या ‘पीकेके’ या कुर्दांच्या संघटनेला तुर्कीने दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. तर या ‘पीकेके’शी संबंधित सिरियातील ‘वायपीजी’ आणि इराकमधील ‘केडीपी’ संघटना यांनाही तुर्कीने दहशतवादी घोषित केले आहे. सिरियातील दहशतवादविरोधी संघर्षात अमेरिकेने येथील कुर्द संघटनांचे सहकार्य घेतल्यानंतर तुर्कीने अमेरिकेला धमकावले होते.

leave a reply