सिरियातील इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ले

सिरियातील इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ले

दमास्कस – सिरियाच्या होम्स प्रांतातील इराणच्या लष्करी तळावर जोरदार हवाई हल्ले झाले. हे हल्ले इस्रायलने चढविल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी सिरियाचा दौरा करुन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्सद यांची भेट घेतल्यानंतर काही तासात हे हल्ले झाले आहेत.

सोमवारी रात्री सिरियाच्या उत्तरेकडील होम्स प्रांतात हवाई हल्ले झाल्याची माहिती ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटना आणि वॉर मॉनिटरने दिली. ‘पालमिरा’ या ऐतिहासिक शहरातील इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे कोसळली, असे या मानवाधिकार संघटनेचे म्हणणे आहे. सदर लष्करी तळावर इराणच्या जवानांप्रमाणे हिजबुल्लाह या इराणसंलग्न संघटनेचे दहशतवादी देखील होते, असा दावा मानवाधिकार संघटना करीत आहेत. त्यामुळे या तळावर मोठी जीवितहानी झाली असून शस्त्रास्त्रांचे साठेही नष्ट झाल्याचे बोलले जाते.

मात्र सिरियन लष्कराने आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने सदर क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचे म्हटले आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला. साधारण दहा दिवसांपूर्वी सिरियातील इराणच्या आणखी एका तळावर हवाई हल्ले झाले होते. या हल्ल्यात सदर तळाचे जबर नुकसान झाले होते आणि इस्रायली सॅटेलाईटने याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. तर त्याआधी इस्रायलने सिरियन लष्कर व हिजबुल्लाहचे दहशतवादी इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ लष्करी हालचाल करीत असल्याचे सांगून त्यावर चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, सोमवारच्या तसेच गेल्या आठवड्यात सिरियावर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी इस्रायलने स्वीकारलेली नाही. या हल्ल्याच्या काही तास आधी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी सिरियाचा दौरा करुन राष्ट्राध्यक्ष अस्सद यांची भेट घेतली. यावेळी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका तसेच मित्रदेशांवर सडकून टीका केली. तसेच इस्रायलपर्यंत प्रवास करुन हल्ले चढविण्याची क्षमता असलेले ड्रोन आपण विकसित केल्याची घोषणा इराणने केली होती. त्यामुळे सिरियातील इराणच्या लष्करी तळावरील हल्ला इराणसाठी नवा इशारा असल्याचा दावा आखातातील माध्यमे करीत आहेत.

leave a reply