विजय माल्ल्याची याचिका ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने फेटाळली

विजय माल्ल्याची याचिका ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने फेटाळली

लंडन – भारतीय बँकांची ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक करून ब्रिटनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनच्या न्यायालयाने धक्का दिला आहे. भारत सरकारकडे प्रत्यार्पण करण्यात येऊ नये यासाठी माल्ल्याने केलेली याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विजय माल्ल्याने फेब्रुवारी महिन्यात प्रत्यार्पणाच्या विरोधात लंडन हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी त्याचा निकाल जाहीर झाला. लंडनच्या रॉयल कोर्टात लॉर्ड जस्टिस स्टीफन इरविन आणि न्यायमूर्ती एलिझाबेथ लिंग यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने मल्ल्याचे अपील फेटाळून लावले आहे. न्यायालयाने हा निर्णय दिला असला तरी पुढील १४ दिवसांच्या आत माल्ल्याला ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे. इथेही माल्ल्याने ही याचिका दाखल केली नाही तर २८ दिवसांच्या आत त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होईल. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांच्याकडे असेल.

या निकालानंतर मल्ल्याने सोशल मीडियावर कायदेशीर लढाई पुढे चालू राहील असे म्हटले आहे. तसेच आपल्यावर ९ हजार कोटी बुडविल्याचे आरोप होतात. पण आपण भरतीला बँकांचे इतके देणे नसून ६२०० कोटी रुपयाचा दावा आपल्याविरोधात आहे. मात्र त्यातीलही २५०० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच आपण याआधी दिलेले कर्ज फेडीचे प्रस्ताव भारतीय बँकांनी नाकारल्याचा आरोप माल्ल्याने केला.

leave a reply