पीओकेमधील दहशतवाद्यांचे तळ उडवून देण्यासाठी वायुसेना सज्ज

- भारताच्या वायुसेनाप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उडवून देण्यासाठी भारतीय वायुसेना सदैव सज्ज आहे. त्यामुळे भारत ‘पीओके’तील दहशतवादी तळांवर हल्ले चढवील या शक्यतेने पाकिस्तान अधिक धास्तावलेला आहे व पाकिस्तानला वाटत असलेली ही चिंता अगदी योग्य आहे, अशा खरमरीत शब्दात भारताचे वायुसेना प्रमुख आर.के.एस भदौरिया यांनी पाकिस्तानला इशारा दिला. याबरोबरच भारतीय वायुसेना पुढच्या काळात ४५० लढाऊ विमाने आपल्या ताफ्यात सहभागी करून घेईल, अशी माहिती वायुसेना प्रमुखांनी दिली आहे.

भारत दहशतवादी हल्ल्याचा बनाव आखून पीओकेवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने करीत आहेत. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून भारताच्या विरोधात अपप्रचाराची जोरदार मोहीम छेडली आहे. पाकिस्तानची माध्यमेही आपल्यापरीने त्यांना साथ देत आहेत. पाकिस्तानचे लष्कर मात्र काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार व मॉर्टर्सचा मारा करून भारतात दहशतवादी घुसविण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहे. यामुळे भारतात दहशतवादी हल्ला घडवायचा व हा दहशतवादी हल्ला म्हणजे भारताचे कारस्थान असल्याचा कांगावा करायचा,असा डाव पाकिस्तानने आखल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानच्या या दबावतंत्राला भारत बळी पडणार नाही, असे भारतीय वायुसेना प्रमुखांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ”भारतीय भूमीत कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर भारत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले चढवून उत्तर देईल, ही धास्ती पाकिस्तानला वाटायलाच हवी. भारत हल्ला चढवेल या चिंतेतून पाकिस्तानला मुक्ती हवी असेल, तर पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया थांबवाव्यात.” असा सज्जड इशारा भारताच्या वायुसेना प्रमुखांनी दिला आहे. यासाठी भारताची वायुसेना पूर्णपणे सुसज्ज असल्याची ग्वाही देऊन वायुसेना प्रमुख भदौरिया यांनी पाकिस्तानला समज दिली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून चीनचे लष्कर व हेलिकॉप्टर भारताच्या सीमेत घुसखोरी करीत असल्याचे समोर आले होते. त्याबाबत बोलताना वायुसेना प्रमुखांनी ही बाब नवीन नसल्याचे म्हटले आहे. याआधीही अशा घुसखोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी भारताने त्याची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई केली होती, याची आठवण वायुसेना प्रमुखांनी करून दिली आहे. चीनच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर वायुसेनेची लढाऊ विमाने या हेलिकॉप्टरच्या मागावर निघाली होती. त्यामुळे वायुसेना प्रमुख उघडपणे चीनच्या या घुसखोरीला विशेष महत्त्व देत नसले तरी संरक्षण दलांनी चीनच्या या घुसखोरीकडे अत्यंत गांभीर्याने पाहिल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, वायुसेना आपल्या ताफ्यात सुमारे ४५० लढाऊ विमानांचा समावेश करणार आहे. यात ३६ रफायल आणि ११४ बहुउद्देशीय लढाऊ विमानांचा समावेश असेल. ही लढाऊ विमाने उत्तर आणि पश्चिम सीमेवर तैनात केले जातील, अशी माहिती वायुसेनाप्रमुखांनी दिली. तसेच नौदलाची विमाने सागरी क्षेत्रात तैनात नसतील, तेव्हा ती वायुसेनेमध्ये सेवा बजावू शकतील, असे भदौरिया यांनी म्हटले आहे.

leave a reply