सिरियातील इराणच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले

दमास्कस – सिरियाची राजधानी दमास्कस जवळ झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणसंलग्न गटाचे पाच दहशतवादी ठार झाले असून अकरा जण जखमी झाले आहेत. इराणच्या ताब्यातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून सदर हल्ले चढवण्यात आले होते, अशी माहिती ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने दिली. काही दिवसांपूर्वीच इराणने सिरियाची हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, सिरियातील इराणच्या तळावर झालेल्या या हल्ल्यांकडे पाहिले जात असून या हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला आहे.

हवाई हल्ले

सोमवारी मध्यरात्रीनंतर दमास्कसच्या दक्षिणेकडील इराणच्या लष्करी तळांवर हे हल्ले चढवण्यात आले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या ताब्यात असलेल्या किशवाह, जबल अल-माने, मुकायलाबिया आणि झाकिया या शहरांवर दोन टप्प्यात हल्ले झाल्याची माहिती सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली. या शहरांमधील शस्त्रास्त्रांची गोदामे लक्ष्य करण्यात आली होती. यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटात इराणसंलग्न गटाचे पाच दहशतवादी ठार तर अकरा जण जखमी झाले असून यामध्ये सात सिरियन जवानांचाही समावेश आहे. इस्रायलच्या गोलान भागातून लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला आहे.

हवाई हल्ले

दहा दिवसांपूर्वी इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सिरियाला भेट देऊन लष्करी करार केला होता. या कराराअंतर्गत इराण सिरियाची हवाई सुरक्षा यंत्रणा सज्ज करून देणार आहे. सिरियाच्या लष्करी तळांवरील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सिरियाची हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत करीत असल्याचे बोलले जात होते. मात्र सिरियातील आपल्याच लष्करी तळांच्या सुरक्षेसाठी इराण हवाई सुरक्षा यंत्रणा उभारीत असल्याचे दावे केले जात आहेत. यासाठी इराणने सिरियामध्ये क्षेपणास्त्रांचा साठा उतरविल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्याआधीच सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर हल्ले झाले असून यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरियाची सरकारी माध्यमे करीत आहेत.

याआधीही सिरियातील हवाई हल्ल्यांसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला होता. पण कुठल्याही देशाच्या माध्यमांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना आपण उत्तर देत नसल्याची भूमिका इस्रायली लष्कराने स्वीकारली आहे.

leave a reply