नायजेरियातील हवाई हल्ल्यात ७० दहशतवादी ठार

- आयएससंलग्न संघटनेच्या वरिष्ठ नेत्यालाही संपविले

दहशतवादी ठारअबूजा – नायजेरियाच्या हवाई दलाने उत्तरेकडील भागात केलेल्या कारवाईत ७० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यामध्ये आयएससंलग्न दहशतवादी संघटनेच्या नेत्यासह पाच कमांडर्सचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नायजेरियाने आयएससंलग्न दहशतवाद्यांविरोधात केलेली ही मोठी कारवाई ठरते. दरम्यान नायजेरियन हवाईदलासाठी अमेरिकेने जवळपास एक अब्ज डॉलर्सच्या लष्करी हेलिकॉप्टरच्या विक्रीला परवानगी दिली आहे. नायजेरियातील मानवाधिकारांच्या मुद्द्यावरून अमेरिकेत जोरदार टीका सुरू असताना, बायडेन प्रशासनाने एवढ्या मोठ्या संख्येने हेलिकॉप्टरच्या विक्रीला परवानगी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते.

गेली काही वर्षे पश्चिम आफ्रिकेतील नायजेरिया, नायजर, कॅमरुन आणि चाड या देशांच्या सीमेवर बोको हराम आणि आयएस संलग्न दहशतवादी संघटना धुमाकूळ घालीत आहेत. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत ४० हजार जणांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षापर्यंत नायजेरिया व नायजेरच्या सीमाभागात बोको हरामचे वर्चस्व होते. पण गेल्या वर्षी दहशतवादी संघटनांच्या अंतर्गत संघर्षामध्ये बोको हरामचा वरिष्ठ नेता अबुबाकर शेखाउ ठार झाल्यानंतर आयएसने या भागावर नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर आयएस संलग्न दहशतवादी संघटनेच्या नायजेर आणि नायजेरियाच्या सीमेवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

अशा परिस्थितीत नायजेरियाच्या हवाईदलाने उत्तरेकडील भागावर हवाई हल्ले चढविले. या कारवाईत नायजेरचे हवाईदलही सहभागी झाले होते. आयएस संलग्न संघटनेचा वरिष्ठ नेता इबून उस्मान याच्यासह पाच वरिष्ठ कमांडर आणि एकूण सत्तरहून अधिक दहशतवादी या कारवाईत मारले गेले. १४ एप्रिल रोजी तुंबून रिगो या भागात ही कारवाई झाल्याचा दावा केला जातो. याशिवाय नायजेरिया, नायजेर, छाड आणि कॅमरुन या चारही देशांच्या सीमेवरील लेक छाड या भागात संयुक्त कारवाई केली. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार केल्याचा दावा पश्चिम आफ्रिकी देशांच्या लष्करी आघाडीने केला. या कारवाईत शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला आहे.

दहशतवादी ठारदरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी पश्चिम आफ्रिकी देशांच्या लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली जाते. नायजेरियाचे लष्कर यासाठी पुढाकार घेते. पण सध्याच्या काळात आयएससंलग्न दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज बनले असून त्यांच्यावर कारवाई करणे आता तितकेसे सोपे राहिलेले नाही. म्हणूनच नायजेरियाने अमेरिकेकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मागणी केली होती. पण नायजेरियाचे सरकार मानवाधिकारांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करून अमेरिकन संसदेच्या काही सदस्यांनी नायजेरियाला शस्त्रपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता.

मात्र गेल्याच आठवड्यात बायडेन प्रशासनाने नायजेरियासाठी जवळपास एक अब्ज डॉलर्सच्या शस्त्रविक्रीला मंजुरी दिली. यात १२ ‘एएच-१झेड वायपर’ लढाऊ हेलिकॉप्टर्स, २८ ‘टी-७०० ४०१-सी इंजिन्स, दोन हजार ‘ऍडव्हान्स्ड् प्रिसिजन किल वेपन सिस्टिम गायडन्स सेक्शन्स’, ‘नाईट व्हिजन इमेजिंग’,‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम्स’ यासह मशिनगन व जीपीएस सिस्टिमचा समावेश आहे.

leave a reply