युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चितता वाढली

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चिततावॉशिंग्टन – युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चितता अधिकच वाढली आहे. या अनिश्‍चिततेचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविली आहे. येत्या काही दिवसात नाणेनिधीकडून ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक २०२२’ अहवाल प्रसिद्ध होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. नाणेनिधीने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या ‘ब्लॉगपोस्ट’मध्ये अनिश्‍चितता व जागतिक मंदीबाबत बजावले आहे. ‘युक्रेनमधील युद्धाची तीव्रता वाढत असतानाच जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चितताही वाढू लागली आहे. ही वाढती अनिश्‍चितता आर्थिक वाढीसाठी अत्यंत वाईट चिन्ह आहे. अनिश्‍चिततेत पडलेली भर उत्पादनावर परिणाम करु शकते. पहिल्या तीन महिन्यातच निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ०.३५ टक्क्यांचा फटका बसेल’, अशी चिंता नाणेनिधीने व्यक्त केली. यापूर्वी ९/११चा दहशतवादी हल्ला, २०१६ साली ‘ब्रेक्झिट’साठी झालेले मतदान व कोरोनाची साथ या घटनांदरम्यान जागतिक अनिश्‍चिततेत वाढ झाली होती, याची जाणीवही करून देण्यात आली.

जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चिततावेबसाईटवर लेखातून दिलेल्या इशार्‍यापूर्वी नाणेनिधीच्या प्रमुखांनीही जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार्‍या धक्क्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगातील बहुसंख्य देशांचे आर्थिक भवितव्य कमकुवत झाले आहे. त्याचवेळी महागाईनेही गंभीर रुप धारण केले आहे व ही महागाई जागतिक अर्थव्यवस्थेसमोर असलेला सर्वात मोठा धोका ठरतो’, असे नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी बजावले.

जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्‍चिततारशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन व अन्नधान्याच्या जागतिक स्तरावरील व्यापाराला जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे आफ्रिकेसह आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नटंचाई भासण्याची शक्यता आहे. जगातील १४३ देशांच्या आर्थिक विकासदरांमध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत’, असेही नाणेनिधीच्या प्रमुखांनी नमूद केले. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची भूराजकीय गटांमध्ये तुकडे पडण्याची भीती आहे, असा इशाराही नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी दिला.

यावेळी त्यांनी महागाईच्या भडक्याकडेही लक्ष वेधले. प्रचंड वेगाने वाढत्या महागाईने जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या प्रक्रियेस हादरे बसत आहेत, असेही नाणेनिधीच्या प्रमुखांनी बजावले.

चीनच्या आर्थिक अहवालानंतर अमेरिका व आशियाई शेअरबाजारांमध्ये घसरण

बीजिंग – कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका चीनच्या आर्थिक विकासदराला बसला आहे. २०२२ सालच्या पहिल्या तिमाहित चीनच्या अर्थव्यवस्थेने ४.८ टक्के वाढ नोंदविली आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने २०२२ सालासाठी ठेवलेल्या ५.५ टक्क्यांच्या लक्ष्याच्या तुलनेत ही मोठी घसरण ठरली आहे. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले असून आशिया व अमेरिकेतील शेअर निर्देशांक खाली आल्याचे दिसून आले.

leave a reply