अजित डोवल यांच्या रशिया भेटीमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या

मॉस्को – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल रशियाच्या भेटीवर आहेत. या दौऱ्यात डोवल यांनी रशियाचे सुरक्षा सल्लागार निकोलाय पत्रुशेव्ह यांच्याशी चर्चा केली. यामुळे पाकिस्तान अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. कारण रशियाच्या युक्रेनबरोबरील युद्धात पाकिस्तान युक्रेनला रशियाच्या विरोधात सहाय्य पुरवित असल्याचे दावे समोर आले आहेत. ही माहिती उघड झाल्याने, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रशियाला भेट देऊन पाकिस्तानच्या विरोधात व्यूहरचना आखत असल्याची चिंता या देशाला सतावू लागली आहे.

Ajit-Dovalकाही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी ब्रिटनला भेट दिली होती. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या देशांचाही जनरल बाजवा यांनी दौरा केला. पाकिस्तानची अवस्था बिकट बनलेली असताना जनरल बाजवा यांचे या देशांमध्ये झालेले स्वागत नजरेत भरणारे ठरते. त्यानंतर आता जनरल बाजवा अमेरिकेला भेट देण्याची तयारी करीत आहेत. त्याच्या आधी जनरल बाजवा यांनी पाकिस्तानला आंतररष्ट्रीय नाणेनिधीचे सहाय्य मिळावे, यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शर्मन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. एकाएकी आंतरराष्ट्री पातळीवर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिळणाऱ्या या प्रतिसादामागे निराळेच कारण असल्याचे दिसू लागले आहे.

ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सची विमाने पाकिस्तानच्या नूर खान एअर बेसवरून उड्डाण करतात आणि अफगाणिस्तान व इराणची हवाई हद्द टाळून ओमानच्या मार्गे सौदी-इजिप्त ते सायप्रस गाठतात. सायप्रसमधून ब्रिटनच्या हवाई दलाची ही विमाने रोमानियामध्ये प्रवेश करतात. या विमानांमधून युक्रेनी लष्करासाठी आणलेले साहित्य व शस्त्रास्त्रे रोमानियातूनच युक्रेनमध्ये धाडले जाते. ६ ते १५ ऑगस्ट दरम्यान ब्रिटनच्या हवाई दलाची विमाने सतत पाकिस्तानच्या नूर खान एअरबेस वरून उड्डाणे करीत होती, अशी माहिती प्रवासी विमानांच्या उड्डाणांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिली आहे.

ही माहिती खरी असेल, तर याचा अर्थ रशिया व युक्रेनमधील युद्धात पाकिस्तानने युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला असा होतो. अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या दबावामुळे किंवा आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी पाकिस्तानला हा निर्णय घेणे भाग पडले असावे. पण याचे भयंकर परिणाम पुढच्या काळात पाकिस्तानला भोगावे लागू शकतात, अशी चिंता या देशातील काहीजणांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल रशियाच्या भेटीवर गेले आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीकडे पाकिस्तान अतिशय सावधपणे पाहत असल्याचे संकेत मिळत आहेत.

पाकिस्तान युक्रेनला सहाय्य पुरवित आहे व याचा फायदा भारत घेतल्यावाचून राहणार नाही. अजित डोवल आपल्या रशिया भेटीत पाकिस्तानच्या विरोधात व्यूहरचना आखतील आणि पाकिस्तानवर संतापलेला रशिया त्याला साथ देईल, अशी भीती सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही पाकिस्तानी विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. याआधीही पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सोव्हिएत रशियाविरोधी युद्धात अमेरिकेचा एजंट म्हणून काम केले होते. त्यानंतर अमेरिकेने पुकारलेल्या अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धातही पाकिस्तानने नाईलाजाने का होईना, अमेरिकेला साथ दिली होती. मात्र ही दोन्ही युद्धे संपल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. युक्रेनच्या युद्धातील पाकिस्तानची उपयुक्तता संपल्यानंतर आधीपेक्षा फार वेगळे होण्याची शक्यता नाही. याची कल्पना असूनही सध्या आर्थिकदृष्ट्या गाळात बुडालेल्या पाकिस्तानला अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या दबावामुळे युक्रेनला सहाय्य पुरविण्यासाठी आपला वापर करू देणे भाग पडत आहे.

याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला काही काळासाठी प्राणवायू जरूर मिळेल. मात्र पुढच्या काळात रशियासारख्या प्रबळ देशाच्या विरोधात जाऊन पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयाचे विघातक परिणाम समोर येणार आहे. यामुळेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या रशिया दौऱ्याने पाकिस्तान अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

leave a reply