भारत व चीनचे संबंध ताणलेले आहेत

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

बँकॉक, – भारताला आंतराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत असलेले स्वतंत्र, खुले व मुक्त ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र अपेक्षित आहे. यासाठी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाच्या ‘क्वाड’ची स्थापना करण्यात आलेली आहे. याला केवळ एकाच ठिकाणाहून विरोध होत आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनवर निशाणा साधला. त्याचवेळी भारत आणि चीनचे संबंध ताणलेले असल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. थायलंडमधील आपल्या दौऱ्यात एका विद्यापीठातील व्याख्यानात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी देशाची भूमिका परखडपणे मांडून थेट शब्दात चीनला लक्ष्य केले.

Jaishankarथायलंडच्या प्रख्यात विद्यापीठात ‘इंडियाज्‌‍ व्हिजन ऑफ द इंडो-पॅसिफिक’ या विषयावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी व उपलब्ध संधी साधण्यासाठी क्वाडची स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत राहणारे मुक्त, खुले, सर्वसमावेशक, शांतपूर्ण व समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्र आम्हाला अपेक्षित आहे. इथे स्थायी व पारदर्शी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक भारताला हवी आहे. या क्षेत्रात सागरी आणि हवाई वाहतुकीचे स्वातंत्र्य असावे आणि विना अडथळा व्यापार सुरू रहावा, अशी भारताची मागणी असल्याचे जयशंकर म्हणाले.

एकमेकांच्या सार्वभौमत्त्वाबद्दल इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वांनाच आदर असावा. तसेच समस्या शांतीपूर्ण चर्चेतून सोडविल्या जाव्या आणि सर्व देशांना समान वागणूक मिळावी, अशी अपेक्षाही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केली. यासाठी भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी असियान देशांची भूमिका अपेक्षित आहे. इंडो-पॅसिफिकमुळे भारताचे असियान देशांबरोबरील सहकार्य अधिकच वाढल आहे, याचा अनुभव असियानचे सदस्य असलेले भारताचे सहकारी देश घेत आहेत, याकडेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले. दरम्यान, या व्याख्यानानंतर परराष्ट्रमंत्र्यांना भारत व चीनच्या संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला. सध्या भारत-चीन संबंध नाजूक स्थितीत असल्याची स्पष्टोक्ती जयशंकर यांनी केली. भारताच्या सीमाभागाजवळ चीनने केलेल्या कारवायांमुळे दोन्ही देशांचे संबंध ताणलेले आहेत. अशा परिस्थितीत भारत व चीन एकत्र येणे अवघड आहे. भारत आणि चीनचे सहकार्य प्रस्थापित झाल्यास हे शतक आशिया खंडाचे असेल, असे दावे केले जातात खरे. पण सध्या तरी ही बाब अवघड असल्याचे दिसते आहे, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी वास्तवाची जाणीव करून दिली.

परराष्ट्रमंत्री जयशंकर तसेच भारताचे इतर नेते देखील चीनवर उघडपणे टीका करीत असून संरक्षणदलांचे प्रमुखही चीनच्या कारवायांवर प्रकाश टाकत आहेत. तर चीन मात्र आपले भारताबरोबर उत्तम संबंध असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. रशियामध्ये होणाऱ्या सरावात चिनी लष्कराबरोबर भारताचे सैन्यपथक देखील सहभागी होणार असल्याचे दावे चीनकडून केले जातात. दोन्ही देशांचे संबंध सुरळीत असून मतभेद दूर झाल्यानंतर हे संबंध पूर्ववत होतील, असे सांगून चीन सध्या तरी भारताला दुखावण्याचे टाळत आहे. त्याचवेळी चीनच्या भारताच्या सीमेजवळील कुरापतखोर कारवाया थांबलेल्या नाहीत. मात्र याचा भारताबरोबरील व्यापारी संबंधांवर परिणाम होऊ नये, यासाठी चीन धडपडत आहे.

leave a reply