अफगाणिस्तानात अल कायदा, आयएसचे अस्तित्त्व नाही

- तालिबानचा दावा

काबुल – जलालाबाद या अफगाणिस्तानच्या शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी ‘आयएस’ने स्वीकारली आहे. यानंतरही तालिबानने अल कायदा व आयएस या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात नसल्याचा निर्वाळा दिला. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने ही घोषणा केली. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आल्यानंतर हा देश दहशतवादी संघटनांचे केंद्र बनेल, ही आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत असलेली चिंता आपल्या मार्गातील अडसर बनू नये, यासाठी तालिबान हे दावे करीत असल्याचे दिसते. दरम्यान, अल कायदाचे अफगाणिस्तानात अस्तित्त्व नसल्याचे सांगणार्‍या तालिबानने आपल्या मंत्रिमंडळात अल कायदाच्या दोन कमांडर्सना सामिल करून घेतले आहे.

अफगाणिस्तानात अल कायदा, आयएसचे अस्तित्त्व नाही - तालिबानचा दावागेले तीन दिवस अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. शहरात गस्त घालणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांच्या वाहनांना लक्ष्य करून हे स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये २५ तालिबानी ठार झाल्याचे सांगून ‘आयएस-खोरासन’ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच तालिबानच्या दहशतवाद्यांवरील हल्ले सुरू राहतील, अशी धमकी आयएसने दिली होती.

आत्तापर्यंत तालिबानने जलालाबादमधील या हल्ल्यांवर बोलण्याचे टाळले होते. पण आयएसने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याला समोर येऊन प्रतिक्रिया देणे भाग पडले. इराक आणि सिरियामध्ये ज्याप्रमाणात आयएसचे अस्तित्व होते, तसे अफगाणिस्तानात नाही. ‘आयएस’ने प्रभावित झालेले काहीजण हे हल्ले घडवित असून तालिबान त्यांचा बंदोबस्त करील, असा दावा मुजाहिदने केला.अफगाणिस्तानात अल कायदा, आयएसचे अस्तित्त्व नाही - तालिबानचा दावा

आयएस’प्रमाणे अल कायदाचे अस्तित्व नसल्याचे मुजाहिदने यावेळी जाहीर केले. पण २००१ साली अमेरिकेने अफगाणिस्तानच्या तोरा-बोरा टेकड्यांवर हवाई हल्ले चढविल्यानंतर, ओसामा बिन लादेनला इथून बाहेर काढणारा अंगरक्षक ‘अन्वर उल हक मुजाहिद’ याच्याकडे जलालाबादची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्याच्याबरोबर अल कायदाचे माजी समर्थक देखील होते. तर काही दिवसांपूर्वी ओसामाचा जुना अंगरक्षक अमिन उल-हक हा देखील जलालाबादमध्येच परतला होता. त्यामुळे अल कायदाचे जुने दहशतवादी आणि ओसामाचे अंगरक्षक जलालाबादमध्ये दाखल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरी देखील अल कायदा अफगाणिस्तानात नसल्याचा दावा तालिबान करीत आहे.

तालिबानप्रमुख जिवंत आहे का? – ब्रिटनच्या मासिकाचा सवाल

लंडन – तालिबानने आपल्या सरकारचा प्रमुख म्हणून घोषित केलेला मुल्ला हैबतुल्ला अखुंदझदा जिवंत आहे का? तालिबानचा उपप्रमुख मुल्ला बरादर हा नजरकैदेत तर नाही ना? असे सवाल ब्रिटनच्या आघाडीच्या मासिकाने केले आहेत. गेल्या काही आठवड्यांमधील अफगाणिस्तानातील घडामोडींचा दाखला देऊन ‘द स्पेक्टेटर’ या मासिकाने हे प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

तालिबानचा प्रमुख हैबतुल्ला अखुंदझदा कंदहारमध्ये असून अफगाणिस्तानातील सरकारस्थापनेनंतर अखुंदझदा अफगाणी जनतेसमोर येईल, असे दावे तालिबानने केले होते. पण तालिबानच्या सरकारची घोषणा होऊन महिन्याहून अधिक काळ उलटला तरी अखुंदझदा समोर आलेला नाही. त्याचा दाखला देऊन अखुंदझदा याचा मृत्यू आधीच झाला असून तालिबान याबाबत लपवाछपवी करीत असल्याचा आरोप ब्रिटिश मासिकाने केला.

तर बंदूकधारी दहशतवादी बाजूला ठेवून तालिबानने मुल्ला बरादर याचा व्हिडिओ तयार केला होता. यावरुन तालिबानमधील प्रभावी गटाने बरादरला नजरकैदेत ठेवल्याचे या मासिकाने म्हटले आहे. याआधी आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी बरादर हक्कानी गटाच्या ताब्यात असल्याचे दावे केले होते.

leave a reply