माजी रशियन हेर लितविनेन्कोच्या हत्येमागे रशियन सरकारचा हात

- युरोपियन न्यायालयाचा निर्णय

लंडन/मॉस्को – रशियाचा माजी हेर अलेक्झांडर लितविनेन्कोच्या हत्येमागे रशियन सरकारचा हात असल्याचा निर्णय युरोपियन न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी रशियन सरकारने लितविनेन्कोच्या पत्नीला एक लाख, २२ हजार युरोंची भरपाई द्यावी, असे आदेशही युरोपियन न्यायालयाने दिले आहेत. रशियाने न्यायालयाचा निर्णय फेटाळला असून युरोपियन न्यायालयाला कोणताही अधिकार नसल्याची प्रतिक्रिया रशियन प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, २०१८ साली माजी रशियन हेर व त्याच्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ब्रिटनने तिसर्‍या रशियन अधिकार्‍यावर आरोपपत्र दाखल केले आहे. २४ तासात एकामागोमाग घडलेल्या या गोष्टींमुळे ब्रिटन व रशियामधील तणाव चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

माजी रशियन हेर लितविनेन्कोच्या हत्येमागे रशियन सरकारचा हात - युरोपियन न्यायालयाचा निर्णय२००६ साली ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये माजी हेर अलेक्झांडर लितविनेन्को याच्यावर ‘पोलोनियम-२१०’ या किरणोत्सर्गी घटकाचा प्रयोग करण्यात आला होता. दोन रशियन नागरिकांना भेटल्यावर काही दिवसांनी ही बाब समोर आली होती. त्यानंतर तीन आठवड्यांनी अलेक्झांडर लितविनेन्कोचा मृत्यू झाला होता. ब्रिटनने केलेल्या तपासात यामागे रशियाचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर आता युरोपियन न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. लितविनेन्को यांची पत्नी मरिनाने न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले असून युरोपिय महासंघ कमकुवत नाही, हा संदेश रशियाला गेल्याचे म्हंटले आहे.

माजी रशियन हेर लितविनेन्कोच्या हत्येमागे रशियन सरकारचा हात - युरोपियन न्यायालयाचा निर्णयलितविनेन्को याने आपल्या मृत्यूपूर्वी दिलेल्या एका निवेदनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना हत्येसाठी जबाबदार धरले होते. ब्रिटनने केलेल्या तपासानंतरही पुतिन यांनी हत्येचे आदेश दिले असावेत, असे नमूद करण्यात आले होते. मात्र रशियाने आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. युरोपियन न्यायालयाचा निर्णयही रशियाने नाकारला आहे. रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी, युरोपियन न्यायालयाकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, २०१८ साली ब्रिटनमधील माजी रशियन अधिकारी सर्जेई स्क्रिपल व त्यांची मुलगी युलियावर झालेल्या रासायनिक हल्ल्याप्रकरणी ब्रिटनने तिसर्‍या रशियन नागरिकाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. डेनिस सर्जिव्ह असे आरोप ठेवण्यात आलेल्या रशियन अधिकार्‍याचे नाव आहे. या हल्ल्यासाठी रशियन गुप्तचर यंत्रणांकडून ‘नोविचोक’ या रासायनिक घटकाचा वापर करण्यात आला होता. मात्र स्क्रिपल व त्यांच्या मुलीला वाचविण्यात ब्रिटीश यंत्रणांना यश आले होते. या हल्ल्यानंतर दोन देशांमधील तणाव टोकाला पोहोचला होता. ब्रिटनने रशियातील आपले राजनैतिक अधिकारी माघारी बोलावले होते.

leave a reply