जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व देशांची प्रगती आवश्यक

- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – जागतिक अर्थव्यवस्था दीर्घकाळासाठी पूर्वपदावर आणायची असेल तर त्यासाठी सर्व देशांची एकत्रितरित्या प्रगती होणे आवश्यक आहे, असा दावा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. ‘जी२० इंटरनॅशनल सेमिनार’च्या व्हर्च्युअल बैठकीदरम्यान अर्थमंत्री सीतारामन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील जागतिक अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सदर वक्तव्य केले. ‘जी२०’ हा जगातील विकसित व उगवत्या अर्थव्यवस्थांचा प्रमुख गट म्हणून ओळखण्यात येतो.

जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व देशांची प्रगती आवश्यक - अर्थमंत्री निर्मला सीतारामनयावर्षी ‘जी२०’ गटाचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे असून बाली शहरात सदस्य देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी, जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी विविध देशांचा सहभाग तसेच सामूहिक कृतीची आवश्यकता असल्याचे मत मांडले. त्याचवेळी सर्वसमावेशकता, गुंतवणूक व संशोधन हे घटकदेखील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांना माफक दरात लस व उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याची जाणीवही भारताच्या अर्थमंत्र्यांनी करून दिली.

यावेळी त्यांनी कोरोनावरील लसीकरण मोहिमेतील भारताची भूमिकाही स्पष्ट केली. भारताने आतापर्यंत देशात १२५ कोटी लसींचे डोस देण्यात यश मिळविले आहे. त्याचवेळी जगभरातील सुमारे ९० देशांना सात कोटी २० लाखांहून अधिक लसींचे डोस पुरविले आहेत, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. बुधवारी झालेल्या ‘जी२०’च्या बैठकीत भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी, २०२२मध्ये भारत पाच अब्ज लसींचे उत्पादन करेल असा दावा केला होता.

जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होणे गरजेचे असल्याकडे भारताच्या अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी पर्यावरणपूरक गुंतवणूक हादेखील महत्त्वाचा घटक ठरणार असून ‘जी२०’ने ‘ग्रीन टेक्नॉलॉजी’बाबत सक्रिय भूमिका घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसले असून अनेक अर्थव्यवस्था मंदीसदृश स्थितीचा सामना करणे भाग पडले आहे. त्यातून बहुतांश अर्थव्यवस्था बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने पुन्हा आव्हान उभे केले आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जी२०’मध्ये भारताच्या अर्थमंत्र्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरते.

leave a reply