चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवान क्षेत्रातील सरावांची व्याप्ती वाढविली

- हाय एक्सप्लोझिव्ह एरिअल बॉम्ब्स व सी माईन्सचा वापर

सरावांची व्याप्तीबीजिंग – अमेरिका व मित्रदेश तैवानच्या संरक्षणाची ग्वाही देत असतानाच चीनने या क्षेत्रातील आपल्या कारवाया अधिक आक्रमक केल्या आहेत. गेल्या काही दिवसात चीनने तैवानच्या नजिक असणार्‍या सागरी क्षेत्रातील सरावांची व्याप्ती वाढविली आहे. काही दिवसांपूर्वीच तैवाननजिकच्या भागात केलेल्या सरावात चीनच्या बॉम्बर्सनी खर्‍या ‘हाय एक्सप्लोझिव्ह एरिअल बॉम्ब्स’ तसेच ‘सी बॉटम माईन्स’चा वापर केल्याची माहिती चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली आहे. या सरावांबरोबर तैवानच्या हवाईहद्दीत सुरू असलेली घुसखोरीही वाढू लागली असून गेल्या नऊ दिवसात चीनच्या जवळपास ३० लढाऊ विमानांनी घुसखोरी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने तैवानच्या मुद्यावर गंभीर इशारा दिला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी तैवानवरील आक्रमणाचे चीनला जबर परिणाम भोगणे भाग पडेल, असे बजावले होते. त्यापूर्वी जपानच्या माजी पंतप्रधानांनीही तैवानवरील हल्ला चीनसाठी आत्मघात ठरेल, याची जाणीव करून दिली होती. तर तैवानच्या मुद्यावरून अमेरिका-चीन युद्ध भडकल्यास त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी होईल, असे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या युद्धनौका सातत्याने तैवानच्या क्षेत्रात गस्त घालत असून जपाननेही संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

सरावांची व्याप्तीया सर्व हालचाली चीनला अस्वस्थ करणार्‍या ठरल्या आहेत. अमेरिका व मित्रदेशांनी तैवानच्या नजिकच्या क्षेत्रातील वावर थांबवावा यासाठी चीनने प्रयत्न सुरू केले असून वाढते सराव त्याचाच भाग ठरला आहे. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने केलेल्या दाव्यांनुसार, चीनच्या नौदलात सामील झालेल्या ‘एच-६जे’ या बॉम्बर्सनी ‘लाईव्ह फायर एक्सरसाईज’मध्ये सहभाग घेतला होता. या सरावात बेटांवर बॉम्बिंग करणे व सागरी सुरुंग पेरणे यांचा समावेश होता. यासाठी खर्‍या ‘हाय एक्सप्लोझिव्ह एरिअल बॉम्ब्स’ तसेच ‘सी बॉटम माईन्स’चा वापर करण्यात आल्याचे म्हटले आहे. ढगाळ वातावरणात तसेच रात्रीच्या वेळेस बॉम्बर्सनी उड्डाण करून ही कामगिरी पार पाडल्याचे सांगण्यात आले.

‘एच-६जे’ चीनने विकसित केलेल्या नव्या बॉम्बर्स विमानांपैकी असून त्याचा नुकताच नौदलात समावेश करण्यात आला आहे. या समावेशानंतर ‘लाईव्ह फायर एक्सरसाईज’ करण्याची बॉम्बर्सची ही पहिलीच वेळ होती, असे चीनकडून सांगण्यात आले. या सरावाव्यतिरिक्त चीनच्या इतर थिएटर कमांडकडूनही साऊथ चायना सीच्या वेगवेगळ्या भागात सराव सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे वाढते सराव अमेरिका व सहकारी देशांची या क्षेत्रातील तैनाती व वावर कमी करावा या उद्देशाने असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला. त्याचवेळी तैवानवर अतिरिक्त दबाव निर्माण करण्यासाठी लढाऊ विमानांच्या घुसखोरीचे प्रमाणही हळुहळू वाढविण्यात येत आहे. गेल्या नऊ दिवसात चीनच्या २८ लढाऊ विमानांनी तैवानच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

leave a reply