दहशतवादाच्या विरोधात सर्वच देशांनी एकजूट करावी

- एससीओच्या बैठकीत उपराष्ट्रपती नायडू यांचे आवाहन

नवी दिल्ली – ‘राष्ट्रीय धोरणाचे अवजार म्हणून दहशतवादाचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात सर्वच देशांनी एकजूट करण्याची आवश्‍यकता आहे, अशा शब्दात भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) बैठकीत उपराष्ट्रपती नायडू यांनी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता, या देशाच्या दहशतवादी धोरणाला लक्ष्य केले. याबरोबरच कोरोना व्हायरसच्या साथीनंतर अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या देशांनी शांततेखेरीज विकास शक्य नसल्याची बाब लक्षात घ्यावी, असा इशाराही भारताच्या उपराष्ट्रपतींनी दिला.

‘दहशतवाद मानवतेचा शत्रू ठरतो. सीमेपलिकडून निर्यात केल्या जाणाऱ्या दहशतवादाचा सर्वच देशांनी एकजुटीने मुकाबला करायला हवा. विशेषतः आपल्या परराष्ट्र धोरणाचे अवजार म्हणून दहशतवादाचा वापर करणे ‘एससीओ’च्या मुलभूत सिद्धांताच्याच विरोधात जात आहेत’, असे सांगून उपराष्ट्रपती नायडू यांनी थेट उल्लेख न करता पाकिस्तानला फटकारले. ‘दहशतवादाचा नायनाट झाल्याखेरीज, देशाकडे असलेल्या क्षमतेचा वापर होऊ शकत नाही. दहशतवादामुळे स्थीर व सुनिश्‍चित आर्थिक विकासासाठी आवश्‍यक असलेल्या वातावरणाची निर्मिती होणार नाही’, याकडे उपराष्ट्रपती नायडू यांनी लक्ष वेधले.

“म्हणूनच दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग, दहशतवाद्यांशी निगडीत असलेले आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘एससीओ’च्या सदस्यदेशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा प्रभावीपणे वापर करावा”, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून आपल्यावरील दहशतवादाचे आरोपांपासून सुटका करून घेण्यासाठी पाकिस्तानने भारतावरच दहशतवादाचे आरोप लगावण्यास सुरूवात केली आहे. याद्वारे भारताच्या आपल्यावरील आरोपांची धार कमी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र पाकिस्तानच्या या डावपेचांचा भारतावर परिणाम होणार नसून भारत प्रत्येक व्यासपीठावर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करीतच राहिल, असा संदेश उपराष्ट्रपती नायडू यांच्या भाषणातून देण्यात आला आहे.

याबरोबरच ‘एससीओ’सारख्या संघटनेत द्विपक्षीय मुद्दे उपस्थित करण्याच्या अपप्रवृत्तीलाही उपराष्ट्रपतींनी लक्ष्य केले. पाकिस्तानने ‘एससीओ’च्या बैठकीत काश्‍मीर प्रश्‍न उपस्थित करून भारताला चिथावणी दिली होती. त्याचा स्पष्टपणे उल्लेख न करता उपराष्ट्रपती नायडू यांनी द्विपक्षीय मुद्दे ‘एससीओ’मध्ये उपस्थित करण्याने या संघटनेच्या मूळ प्रेरणेलाच धक्का बसत असल्याचा ठपका ठेवला. त्याचवेळी भारत वेगाने आर्थिक प्रगती करीत असल्याची नोंद करून उपराष्ट्रपती नायडू यांनी 2025 सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन डॉलर्स’चे ध्येय गाठणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

भारतातील मोबाईलधारकांची संख्या 100 कोटी इतकी आहे. त्याचवेळी भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 60 कोटीच्याही पुढे गेलेली आहे. जगातील सर्वात मोठी ‘डिजिटल इकोसिस्टीम’ म्हणून भारत उदयाला येत आहे, असे सांगून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारताची अफाट क्षमता अधोरेखित केली. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे ‘एससीओ’च्या सर्वच सदस्यदेशांची अर्थव्यवस्था मंदावली आहे. पण भारताने या साथीचा मुकाबला करीत असताना, चांगली आर्थिक कामगिरी करून दाखविली आहे, असा दावा उपराष्ट्रपती नायडू यांनी केला.

leave a reply