इराणी राजवटीच्या विरोधातील गटाने इस्रायलला सहाय्य केले

- इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा आरोप

तेहरान – फखरीझादेह यांच्या हत्या घडविण्यासाठी इराणमधील खामेनी राजवटीच्या विरोधात बंड पुकारणारी आणि हद्दपार असलेली ‘पिपल्स मुजाहिद्दीन ऑफ इराण’ (एमईके) या संघटनेने इस्रायल व ‘मोसाद’ला सहाय्य केले, असा ठपका इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी रिअर ऍडमिरल अली शामखानी यांनी ठेवला. तर अणुशास्त्रज्ञ गमावल्यामुळे अस्वस्थ झालेले इराणचे अधिकारी संतापाच्या भरात द्वेषपूर्ण आणि खोट्या आरोपांचा आधार घेत असल्याचा पलटवार ‘एमईके’ने केला आहे.

इराणमधील राजवटीची कडवी विरोधक असलेल्या ‘एमईके’ या पॅरिसस्थित संघटनेने फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इस्रायल आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ला सहाय्य पुरविल्याचे धागेदोरे सापडल्याचा दावा शामखानी यांनी केला. मात्र याचे तपशील शामखानी यांनी दिलेले नाहीत. पण फखरीझादेह यांच्या हत्येबाबत शामखानी यांनी एक नवा दावा केला. अणुशास्त्रज्ञाची हत्या घडविण्यासाठी फारच जटील योजनेचा वापर केला गेला. इलेक्ट्रॉनिक शस्त्राचा वापर करून हा हल्ला चढविला गेला, असे शामखानी म्हणाले.

गेल्या दोन दिवसांपासून इराणी नेते, अधिकारी व माध्यमे फखरीझादेह यांच्या हत्येबाबत वेगवेगळे दावे केले आहेत. ‘मोसाद’च्या एजंट्सनी स्फोट घडवून व बेछूट गोळीबार करुन फखरीझादेह यांची हत्या घडविल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला होता. त्यानंतर या हल्ल्यामध्ये इस्रायलने रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारी ट्रकवर बसविलेली मशीनगन वापरल्याचाही दावा करण्यात आला होता.

leave a reply