कोरोनाचे संक्रमण वाढल्याने महाराष्ट्रात गर्दीच्या सर्व कार्यक्रमांना बंदी

विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध - पुणे, नाशिकमध्ये रात्री ११ नंतर संचारबंदी - राज्यात चोवीस तासात सात हजार नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविल्या आहेत. रविवारी सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासात राज्यात ६ हजार ९७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारच्या तुलनेत चोवीस तासात आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या ७००ने अधिक आहे. विदर्भात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने येथील पाच जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सायंकाळी ५ नंतर दुकानेही बंद राहणार असून संचारबंदी असेल. तसेच अमरावती आणि अचलपूर शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यापार्श्‍वभूमीवरराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना गर्दीच्या सर्व कार्यक्रमांना राज्यभरात बंद घातली आहे. तसेच पुढील आठ दिवसात कोरोना संक्रमणाची स्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे बाजावले आहे.

महाराष्ट्रात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहेत. चोवीस तासात आढळत असलेल्या नव्या रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा देशात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. सलग तीन दिवस सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. विदर्भात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. त्यामुळे अमरावती, आकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. येथे सर्व बाजार ५ नंतर बंद राहणार आहेत. तसेच लग्न समारंभातही २५ पेक्षा जास्त जणांच्या उपस्थितीला बंदी असेल. हॉटेल्स फक्त पार्सल सेवेसाठी सुरू ठेवण्यात येणार असून कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. हे निर्बंध १ मार्च पर्यंत लागू राहणार आहेत.

विदर्भाबरोबर राज्यातील इतर भागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या मुख्य शहरांमध्ये गेल्या दोन आठवड्यात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे. रुग्णांची वाढलेली संख्या पाहता पुणे आणि नाशिक शहरात रात्री ११ नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. मुंबईत रविवारी ९२१ नवे रुग्ण आढळले. तर ठाणे परिमंडळात १६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर नाशिक परिमंडळात ८८३ नवे रुग्ण सापडले आहेत. पुणे परिमंडळात १३०९ नव्या रुग्ण आढळले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना लॉकडाऊन करावे लागू शकते, असे संकेत दिले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यावर राज्यात बर्‍याच गोष्टी खुल्या झाल्या होत्या. मात्र कोरोना गेल्याच्या अविर्भावात वावरणार्‍या काही जणांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा चिंता वाढल्या आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळात, हात स्वच्छ धुवा हेच सध्या आपल्याकडील प्रभावी शस्त्र आहे. कोरोनाची साखळी तुटली नाही आणि संख्या अशीच वाढत राहिली, तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल. येत्या आठ दिवसात स्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

leave a reply