आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये ‘ब्युबॉनिक प्लेग’च्या साथीत ३१ जणांचा बळी

- कोरोना व एबोलानंतर आफ्रिकेवर तिसर्‍या साथीचे संकट

किन्शासा – आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये कोरोनाव्हायरस व एबोलापाठोपाठ ‘ब्युबॉनिक प्लेग’च्या साथीने हाहाकार उडविला आहे. आतापर्यंत या साथीत ३१ जणांचा बळी गेला असून ५००हून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. देशाच्या ईशान्य भागातील ‘इतुरी’ प्रांतात साथीचा फैलाव झाला आहे. हा प्रांत युगांडा व दक्षिण सुदान या दोन देशांना लागून असल्याने या देशांमध्येही साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात इतुरी प्रांतात ‘ब्युबॉनिक प्लेग’चे काही रुग्ण आढळले होते. मात्र गेल्या महिन्याभरात साथ मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत इतुरी प्रांतात ‘ब्युबॉनिक प्लेग’चे ५२०हून अधिक रुग्ण आढळले असून त्यातील ३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आरोग्यमंत्री पॅट्रिक कारामुरा यांनी दिली. ‘इकोहेल्थ अलायन्स’ या अमेरिकास्थित स्वयंसेवी गटाने नवी साथ अधिक घातक असल्याचे संकेत दिले आहेत. साथीच्या रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्के रुग्ण १७ वर्षांखालील वयोगटातील असल्याकडेही सदर गटाने लक्ष वेधले आहे.

डीआर काँगोमध्ये कोरोनाव्हायरस व एबोलाचीही साथ पसरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या साथीत २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून ७००हून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्याचवेळी गेल्या आठवड्यापासून एबोलाचा संसर्गही वाढण्यास सुरुवात झाली असून चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. यात ‘ब्युबॉनिक प्लेग’ची भर पडल्याने डीआर काँगो सरकारसमोरील आव्हान अधिकच तीव्र झाल्याचे मानले जाते.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीनच्या इनर मंगोलिया भागात ‘ब्युबॉनिक प्लेग’ची साथ आली होती. या साथीचे चार रुग्ण आढळल्यानंतर चिनी यंत्रणांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या दीडशेहून अधिक जणांना क्वारंटाईन केले होते. आजार प्राण्यांचे मांस व मानवी संसर्ग अशा दोन्ही माध्यमातून पसरत असल्याने लेव्हल३ इमर्जन्सी जारी करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली होती. मात्र त्यानंतर चिनी यंत्रणांनी याबद्दल कोणतीच माहिती उघड केलेली नाही.

जीवाणूंमुळे होणारा ब्युबॉनिक प्लेग हा आजार ब्लॅक डेथ या नावानेही ओळखण्यात येतो. पिसवा चावल्यामुळे व संसर्ग झालेल्या या प्राण्यांचे मांस आहारात आल्याने या प्लेगचा प्रसार होतो. मध्ययुगीन काळात (मिडल एजेस) या ब्युबॉनिक प्लेगच्या आजाराने युरोपीय देशांमध्ये किमान पाच कोटी जणांचा बळी घेतल्याचा इतिहास आहे.

leave a reply