अमेरिकेच्या वर्चस्ववादाचा दारूण पराभव झाला आहे

- इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी

राष्ट्राध्यक्ष रईसीतेहरान – ‘६ जानेवारी रोजी अमेरिकन कॉंग्रेसवर झालेला हल्ला आणि महिन्याभरापूर्वी दोन अफगाणींचा अमेरिकेच्या विमानातून पडून झालेला दुर्दैवी अंत, या दोन घटनांनी या वर्षाचा इतिहास घडविला. देशांतर्गत असो किंवा देशाबाहेर असो, अमेरिकेच्या वर्चस्ववादी धोरणांवर विश्‍वास ठेवता येणार नाही, हा स्पष्ट संदेश कॅपिटल हिलपासून ते काबुलपर्यंतच्या या घटनांनी सार्‍या जगाला दिला’, असा शेरा इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी मारला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी अमेरिकेवर हा हल्ला चढविला. अमेरिका व मित्रदेशांच्या आश्‍वासनांवर इराणचा विश्‍वास नसल्याचे रईसी यांनी यावेळी ठासून सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी राष्ट्रसंघातील आपल्या प्रारंभीच्या भाषणात अफगाणिस्तानातील युद्ध आणि माघारीचा उल्लेख केला होता. २० वर्षांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील युद्ध संपविल्याचे बायडेन म्हणाले होते. यावर इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ताशेरे ओढले. अमेरिकेचे वर्चस्ववादी आणि निर्बंधांचे धोरण सपशेल अपयशी ठरल्याचा ठपक रईसी यांनी ठेवला.

राष्ट्राध्यक्ष रईसी‘वर्चस्ववादी शासक, त्यांची इतर देशांवर वर्चस्व गाजविण्याची आणि पाश्‍चिमात्य संस्कृती लादण्याची योजना दारूण अपयशी ठरली आहे. अमेरिकेच्या याच वर्चस्ववादी धोरणांमुळे या क्षेत्रात रक्तपात झाला आणि अस्थैर्य निर्माण झाले. शेवटी अमेरिकेला या क्षेत्रातून पराभूत होऊन पळ काढावा लागला. अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानातून माघार घेतली नाही तर त्यांची हकालपट्टी झाली’, असा टोला राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी लगावला.

अमेरिकेच्या या अपयशाचे परिणाम पॅलेस्टाईन-सिरियापासून ते येमेन आणि अफगाणिस्तानातील जनतेला भोगावे लागत आहेत. अमेरिकेतील करदाते देखील याच वर्चस्ववादाच्या परिणामांना सामोरे जात असल्याचा ठपका इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवाला. इराणविरोधात अमेरिकेने निर्बंधांचे युद्ध छेडले असून कोरोनाच्या काळात अमेरिकेने लादलेले निर्बंध म्हणजे मानवतेविरोधातील गंभीर गुन्हा असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठेवला. पण निर्बंधांखाली इराणला दाबण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न देखील अपयशी ठरल्याचे रईसी यांनी राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात सांगितले.

राष्ट्राध्यक्ष रईसीनिर्बंधांद्वारे युद्ध पुकारणारी अमेरिका आता इराणबरोबर अणुकरारावर वाटाघाटी करण्यासाठी उत्सुकता दाखवित आहे. पण इराणचा अमेरिकेवर विश्‍वास उरलेला नाही, असा इशारा रईसी यांनी दिला. अमेरिकेची जनता देखील आपल्या देशाच्या प्रशासनावर टीका करीत आहे, याकडे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. यानंतर रईसी यांनी इस्रायलला लक्ष्य केले. इस्रायला हा दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला. तर गाझापट्टीची कोंडी करून इस्रायलने गाझापट्टीला जगातील सर्वात मोठे कारागृह बनविल्याचा दावा रईसी यांनी केला.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या या आरोपांवर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रत्युत्तर आले आहे. ‘खोटेपणा आणि द्वेषाने भरलेल्या आपल्या भाषणाद्वारे रईसी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला मुर्ख बनविण्याचा प्रयत्न केला’, असे ताशेरे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओढले. तसेच इराणमधील राजवट आखातासह जागतिक शांततेसाठी धोकादायक असल्याचा इशारा इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. दरम्यान, व्हिएन्ना येथील आण्विक वाटाघाटी पुढील काही महिने सुरू होणार नसल्याचे इराणने जाहीर केले आहे. या कालावधीत इराण अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक ते साहित्य प्राप्त करू शकतो, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

leave a reply